Mahendra Dalvis warning said Be prepared : महेंद्र दळवींचा इशारा, म्हणाले ‘सज्ज व्हा’
Mumbai: रायगड जिल्ह्यात झालेल्या एका कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. “मी मूठ उघडली तर तटकरे चेहरा दाखवण्यालायक राहणार नाहीत,” अशा तीव्र शब्दांत त्यांनी तटकरेंवर निशाणा साधत राजकीय वातावरण तापवलं आहे.
दळवी म्हणाले, “मी अनेक केसेस डोक्यावर घेऊन आमदार झालोय. त्यामुळे यापुढे जर कोणी आमच्या कार्यकर्त्यांना फोनवर त्रास दिला किंवा काही बोलले, तर ते कदापि सहन केले जाणार नाही.” त्यांनी विरोधकांना थेट इशारा देत सांगितलं की, “मी भरत गोगावले यांचा शिष्य आहे. आम्ही वारकरी. मैदानात यायला वेळ लागतो, पण आलो की थेट धडक देतो. मुरुडनंतर आता रोहा दत्तक घेतलं आहे. येथील जनतेच्या हक्कासाठी मी लढणार आहे. महिलांचा आदर करणारे कार्यकर्ते आमच्याकडे आहेत आणि अन्याय झाल्यास मी ठामपणे उभा राहीन.”
Heavy Rains Cause Crop Damage : तुटपुंजी मदत शेतकऱ्याने सरकारला केली परत !
या कार्यक्रमात दळवी यांनी विशेष संदेश दिला. “रोहेकरांना आता काहीच कमी पडू देणार नाही. त्यामुळे रोहामधील जनतेने सज्ज व्हा,” असं आवाहन करत त्यांनी आगामी राजकीय लढाईची तयारी दर्शवली. सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात येऊन दिलेला हा इशारा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठं राजकीय वळण घेण्याची शक्यता निर्माण करतो.
आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका लक्षात घेता दळवी म्हणाले, “या निवडणुका आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तटकरे घराणे खालसा करायचं आहे. ते बाहेरच्यांना उमेदवारी देत नाहीत, सगळं घरातच ठेवलं जातं. कार्यकर्त्यांना फक्त ‘हाय-हॅलो’ करत बसायचं, असं तटकरे घराणं समजतं.” अशा थेट शब्दांत त्यांनी तटकरेंवर सडकून टीका केली.
माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी दळवी यांच्यावर “चिटर” अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना दळवी म्हणाले, “तुझा बाप चिटर आहे,” असं प्रत्युत्तर देत त्यांनी पलटवार केला. या विधानामुळे रायगडमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
Radhakrushna Vikhe Patil : ‘आरक्षणावरून दुही पसरविण्याचे पाप शरद पवारांचे!’
दळवी पुढे म्हणाले, “आगामी निवडणुकांमध्ये महायुती आणि आघाड्या होत राहतील, पण येथे ताकद आमच्याकडेच आहे. त्यामुळे आम्ही वारंवार येथे येत राहू.” असं सांगत त्यांनी रायगडमधील आपली राजकीय उपस्थिती बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. आता महेंद्र दळवी यांच्या या तीव्र टीकेवर सुनील तटकरे काय पलटवार करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.