Congress and UBT give ‘no response’ to the MLA’s appeal : आमदारांच्या आवाहनाला काँग्रेस-उबाठाकडून ‘नो रिस्पॉन्स’
Chikhli नगरपरिषद निवडणुकीनंतर शहरात सौहार्द आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी भाजपच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी ६ डिसेंबर रोजी ‘संवाद सलोख्याचा’ या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले. निवडणुकीतील सर्व उमेदवारांना लेखी निमंत्रण देऊन राजकीय कटुता दूर करण्याचा आणि सर्वसमावेशक विकासासाठी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र बैठकीला काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
बैठकीला भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांचे उमेदवार उपस्थित होते. परंतु काँग्रेस व उबाठाचे उमेदवार केवळ गैरहजरच नव्हे, तर काहींनी तर निमंत्रणपत्रही स्वीकारले नसल्याचे समोर आले. त्यामुळे “भाजपाने पुढे केलेला सलोख्याचा हात विरोधकांनी धरला नाही” अशी भूमिका भाजपपक्षीयांकडून मांडली जात आहे.
Local Body Elections : मिनी मंत्रालयातील ‘दोस्तीतील कुस्ती’ पुन्हा रंगणार?
काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काशिनाथ बोंद्रे यांचा प्रतिसाद मिळू शकला नाही. मात्र उबाठाचे चिखली शहरप्रमुख श्रीराम झोरे यांनी या सर्वप्रसंगावर स्पष्ट भूमिका मांडली.
“सलोखा खरा असावा तर तो वरच्या नेतृत्वातून खाली यायला हवा. आमचे तिकिट देणारे वरिष्ठ नेतेच उपस्थित नसताना आम्ही कार्यकर्त्यांनी बैठकीला जाण्यात अर्थ नव्हता. सर्वपक्षीय सलोखा हा फक्त एकाचा किंवा एका पक्षाचा कार्यक्रम नसतो,” असे झोरे यांनी सांगितले.
Local Body Elections : पालिका निवडणुकीत मिळाला ‘धडा’, ‘मिनी मंत्रालया’च्या निवडणुकीत सावध
तसेच “सामान्य कार्यकर्त्यांना बळीचा बकरा बनविण्यापेक्षा सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते एका मंचावर बसले तरच खरी सलोखा राजकारणाची सुरुवात होईल,” असा टोला त्यांनी लगावला.
चिखलीतील निवडणुक पश्चात वातावरण सौम्य करण्याचा प्रयत्न अपूर्ण राहिल्याने सर्वपक्षीय सलोख्याचा पुढील टप्पा कसा असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








