To contest together in eight municipal corporations across the state : राज्यातील 8 महापालिकांत एकत्र लढणार, राजकीय समीकरणे बदलणार
Akola राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच राजकीय समीकरणांना वेग आला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि निर्णायक घडामोड समोर आली असून, आतापर्यंत मुंबई–पुण्यापुरती मर्यादित वाटणारी ‘ठाकरे बंधूंची’ युती आता थेट विदर्भाच्या मैदानात उतरणार आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या विदर्भातील चार महत्त्वाच्या महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना (ठाकरे गट) आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण आठ मोठ्या महापालिकांमध्ये ‘ठाकरे ब्रँड’ची ताकद एकवटलेली दिसणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी या युतीला अधिकृत दुजोरा दिला आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या चारही महापालिकांमध्ये शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्रितपणे भाजप व महायुतीला आव्हान देणार आहेत. “विदर्भात ठाकरे ब्रँड एकत्र येत असून, याचा सकारात्मक परिणाम निवडणूक निकालात दिसेल. या युतीला मोठे यश मिळेल,” असा विश्वास उंबरकर यांनी व्यक्त केला.
Municipal council election : देऊळगाव राजात राजकीय प्रतिष्ठेची निवडणूक
तळागाळात जाण्याची तयारी अंतिम टप्प्यात
राजू उंबरकर सध्या अकोला जिल्हा दौऱ्यावर असून, त्यांनी मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. अकोला महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीही यावेळी घेण्यात आल्या. विदर्भातील जागावाटप आणि प्रचाराची संयुक्त रणनीती अंतिम टप्प्यात असल्याचे या हालचालींवरून स्पष्ट होत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आधीच चर्चेत असलेली ठाकरे बंधूंची युती आता विदर्भात पोहोचल्याने राजकीय गणिते बदलणार असल्याचे मानले जात आहे.
भाजपच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचे आव्हान
नागपूर हे भाजपचे, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शक्तिकेंद्र मानले जाते. अशा परिस्थितीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास भाजपपुढील आव्हाने वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भातील शहरी मतदारांमध्ये मनसेची ताकद आणि शिवसेना (ठाकरे गट) चे संघटन एकत्र आल्यास त्याचा थेट फटका सत्ताधारी महायुतीला बसू शकतो.
८ महापालिकांत ‘लढाई’ निश्चित
मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत आधीच मिळाले होते. आता त्यात विदर्भातील चार शहरांची भर पडल्याने राज्यातील आठ महत्त्वाच्या महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात ही आघाडी कितपत प्रभावी ठरते आणि मतविभाजनावर काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Municipal Corporation Elections : राजकीय हालचाली वाढल्या; युती-आघाड्यांची जुळवाजुळव सुरू
मुंबईसाठी शिवसेना–भाजपमध्ये १५० जागांवर एकमत
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात जागावाटपावर दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये १५० जागांवर एकमत झाल्याची माहिती भाजप नेते अमित साटम यांनी पत्रकार परिषदेत दिली. उर्वरित ७७ जागांवर लवकरच चर्चा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“उर्वरित ७७ जागांसाठी आमची चर्चा सुरू आहे. एकमेकांना आकडेवारी देण्याची प्रक्रिया सुरू असून, येत्या दोन दिवसांत ती पूर्ण होईल. त्यानंतर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. त्यानंतरच अधिकृत घोषणा केली जाईल,” असे अमित साटम यांनी सांगितले. तसेच मुंबई महापालिकेला ‘विकून खाणाऱ्यांना’ घरी बसवण्यासाठी महायुती सज्ज असल्याचा दावा त्यांनी केला.








