Khamgaon Municipal Council’s power tussle set to end : खामगावात राजकीय मोर्चेबांधणीला वेग, स्वीकृत सदस्यांसाठी चुरस
Khamgao स्थानिक नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर आता खऱ्या अर्थाने राजकीय हालचालींना वेग आला आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांनी येत्या १३ जानेवारी रोजी नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा बोलावली असून, या सभेत शहराच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च पदाची म्हणजेच उपाध्यक्षांची निवड होणार आहे. याच सभेत स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवरही शिक्कामोर्तब होणार असल्याने राजकीय गणितांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ च्या कायदेशीर तरतुदींनुसार ही सभा पार पडणार आहे. निवडीचा कार्यक्रम
खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे:
सकाळी ११ ते ११:४५: उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि अर्जांची छाननी.
दुपारी १२:१५ ते १२:३०: अर्ज मागे घेण्यासाठी वेळ.
दुपारी १२:३० नंतर: उपाध्यक्ष पदासाठी प्रत्यक्ष निवडणूक आणि घोषणा.
उपाध्यक्ष पदासाठी सत्ताधारी आणि विरोधी गटांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. नगराध्यक्ष पद भाजपकडे (अपर्णा फुंडकर) असल्याने, उपाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागते, यावर नगरपरिषदेतील आगामी काळातील सत्तासमीकरणे अवलंबून असतील. निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळते की मित्रपक्षाला सोबत घेण्यासाठी तडजोड केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Local Body Elections : नगराध्यक्ष आणि बहुमतातील ‘संघर्ष’ शहरांच्या विकासाला ठरणार मारक?
उपाध्यक्ष निवडीनंतर स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा ठराव मांडला जाणार आहे. या पदांसाठी अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांची नावे चर्चेत आहेत. ज्यांना निवडणुकीत तिकीट मिळाले नाही किंवा जे अल्प मतांनी पराभूत झाले, अशा ‘तगड्या’ चेहऱ्यांना स्वीकृत सदस्य म्हणून सभागृहात आणण्यासाठी पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू झाली आहे.
या पहिल्या सभेमुळे नगरपरिषदेच्या औपचारिक कामकाजाला सुरुवात होणार आहे. उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड झाल्यानंतरच विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड केली जाईल. त्यामुळे १३ जानेवारीच्या या सभेकडे केवळ राजकीय कार्यकर्तेच नव्हे, तर संपूर्ण खामगाववासीयांचे लक्ष लागले
आहे.








