Akola Mayoral Election : ४५ विरुद्ध ३२ : भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचा दणदणीत विजय

BJP’s Sharda Khedkar becomes Akola’s mayor : महापौरपदी शारदा खेडकर, उपमहापौरपदी अमोल गोगे विराजमान

Akola महापालिकेतील सत्तासंघर्षाच्या निर्णायक टप्प्यावर भाजप प्रणित शहर सुधार आघाडीने आपले संख्याबळ ठामपणे सिद्ध करत महापौर व उपमहापौर ही दोन्ही महत्त्वाची पदे आपल्या ताब्यात घेतली आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या शारदा खेडकर यांना ४५ मते मिळाली, तर उद्धव सेनेच्या उमेदवार सुरेखा काळे यांना ३२ मतांवर समाधान मानावे लागले.

या निवडणुकीत एमआयएमचे तीन नगरसेवक तटस्थ राहिले, तर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी थेट भाजप प्रणित शहर सुधार आघाडीच्या उमेदवारांना मतदान करत राजकीय समीकरणे बदलून टाकली. त्यामुळे विरोधकांकडून ३६ मतांचा दावा करण्यात येत असलेला आकडा प्रत्यक्षात ३२ वर घसरला आणि सत्तेचे पारडे निर्णायकरीत्या भाजपकडे झुकले.
महापौर निवडणुकीनंतर झालेल्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही हेच संख्याबळ कायम राहिले. शहर सुधार आघाडीचे उमेदवार अमोल गोगे यांना ४५ मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार आजाद खान (अलीयार खान) यांना ३२ मते मिळाली. परिणामी, महापालिकेतील सत्तासमीकरणावर भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा ‘ऑन दि स्पॉट फोन’; प्रशासन लागले कामाला !

विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वी विरोधकांकडून विविध पातळ्यांवर जोरदार हालचाली, संपर्क आणि राजकीय जुळवाजुळव सुरू होती. मात्र एमआयएमचा तटस्थ निर्णय आणि अपक्ष नगरसेवकाचा भाजपला मिळालेला पाठिंबा या दोन निर्णायक घटकांनी विरोधकांची सर्व गणिते कोलमडली. यामुळे शहर सुधार आघाडीचे संख्याबळ ४५ वर स्थिरावले आणि विरोधकांना अनपेक्षित धक्का बसला.

state health index : आरोग्य निर्देशांकात जिल्हा शून्य; राज्यात शेवटून पाचवा

या निकालातून स्पष्ट झाले आहे की, महापालिकेतील सत्ता केवळ संख्याबळावर नाही, तर योग्य वेळी घेतलेल्या राजकीय निर्णयांवर ठरते. ४५ मतांच्या स्पष्ट बहुमताने शारदा खेडकर आणि अमोल गोगे हे दोघेही आता महापालिकेच्या सर्वोच्च पदांवर विराजमान झाले असून, आगामी काळात महापालिकेच्या धोरणांवर शहर सुधार आघाडीचा ठसा उमटण्याची दाट शक्यता आहे.
महापालिकेतील या सत्तांतराने विरोधकांच्या प्रयत्नांना जोरदार हादरा बसला असून, भाजपसाठी हा निकाल केवळ पदांचा नव्हे, तर राजकीय विश्वासार्हता आणि संघटनात्मक ताकदीचा मोठा विजय मानला जात आहे.