Villagers protest at panchayat samiti : सुटाळा बु. ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा ‘पूर’; ग्रामस्थांनी उपसले अस्त्र!

alleged-corruption-in-sutala-gram-panchayat : गटविकास अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रोष वाढला; काळे झेंडे दाखवले

Khamgao खामगाव तालुक्यातील सुटाळा बु. ग्रामपंचायतीच्या कारभारावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचार आणि नियमबाह्य कामांच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी पंचायत समितीवर धडक दिली. प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत ग्रामस्थांनी दाखवलेल्या काळ्या झेंड्यांमुळे पंचायत समितीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, हे प्रकरण आता स्थानिक राजकारणात सत्ताधारी आणि प्रशासकीय युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहे.

या संघर्षाची सुरुवात २६ जानेवारीच्या ग्रामसभेत झाली होती. ग्रामस्थांनी विविध विकासकामांच्या खर्चाचा हिशोब मागितला असता, सरपंच आणि ग्रामसेवकांनी समाधानकारक उत्तरे न देता सभा गुंडाळली, असा आरोप आहे. ग्रामसभेतील या अपमानाचा निषेध म्हणून आधी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ‘डफडे बजाव’ आंदोलन करण्यात आले, मात्र तरीही दाद न मिळाल्याने हा संघर्ष आता पंचायत समितीच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे.

State Election Commission : ‘मार्कर’ला फाटा, पुन्हा ‘म्हैसूर शाई’ची एन्ट्री!

राजकीय प्रभावाचा वापर करून नदीपात्रात उभारण्यात आलेल्या एका कथित अवैध संरक्षक भिंतीवरून ग्रामस्थांनी प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या भिंतीमुळे दलित वस्ती आणि ऐतिहासिक महादेव मंदिराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. ही भिंत पाडण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याने, सरपंच-ग्रामसेवक आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांमध्ये ‘टक्केवारीचे’ साटेलोटे असल्याचा गंभीर राजकीय आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

आंदोलनकर्ते जेव्हा जाब विचारण्यासाठी पोहोचले, तेव्हा गटविकास अधिकारी (BDO) चंदनसिंह राजपूत कार्यालयात उपस्थित नसल्याने ग्रामस्थांचा पारा चढला. “लोकशाहीत जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायला अधिकारी पळ काढत आहेत का?” असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

Election Commission : खर्चाचा अहवाल सादर केला नाही, शंभरहून अधिक उमेदवारांना नोटीस

ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी सरपंच आणि ग्रामसेवकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, ती वादग्रस्त भिंत तत्काळ पाडण्याचा इशारा दिला आहे. जर प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही, तर हे आंदोलन थेट जिल्ह्यापर्यंत नेण्याचा आणि आगामी निवडणुकांमध्ये याचे परिणाम दाखवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.