President Droupadi Murmu Shegao Visit : राष्ट्रपतींचा दौऱ्यातून शेगावच्या विकासाला ‘बुस्ट’ मिळणार की केवळ तात्पुरती मलमपट्टी?

Will the President’s visit give a ‘boost’ to Shegaon’s development? : व्हीव्हीआयपी दौऱ्याच्या निमित्ताने प्रशासनाची धावपळ; संतनगरीतील रखडलेले प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Shegao संतनगरी शेगावमध्ये आगामी २५ व २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा प्रस्तावित आहे. या व्हीव्हीआयपी भेटीमुळे शहराचा रखडलेल्या विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित आरोग्य मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रपती येत असल्या तरी, “दौरा राष्ट्रपतींचा आणि कामे प्रशासनाची” असा सूर सध्या उमटत आहे.

२०१० पासून शेगाव विकास आराखड्यावर कोट्यवधींचा खर्च झाला असून प्रशासन हा आराखडा ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करत आहे. मात्र, प्रत्यक्षात चित्र काहीसे विदारक आहे. मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक कोंडीचा विळखा इतका घट्ट आहे की दररोज अपघातांची भीती असते. अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असून, गटार व्यवस्थेच्या अभावामुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न लाखो भाविक येणाऱ्या या शहरात आजही सुटलेले नाहीत.

Delay in local body elections : ५२५ ग्रामपंचायतींवर प्रशासक बसवताना प्रशासन अडचणीत

राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे शहरातील खड्डे बुजवणे, रस्ते चकाचक करणे आणि रंगरंगोटीला वेग आला आहे. मात्र, शेगावकरांचा अनुभव काहीसा कडवट आहे. “दौरे येतात आणि जातात, मात्र प्रशासनाचे गांभीर्य दौरा संपल्यानंतर उरत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. केवळ व्हीव्हीआयपींच्या प्रवासाचा मार्ग सुधारण्यापेक्षा संपूर्ण शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हा दौरा निमित्त ठरावा, अशी मागणी होत आहे.

शहरातील वाढती गर्दी पाहता शेगावला आता एका सक्षम ‘रिंगरोड’ची नितांत गरज आहे. राष्ट्रपतींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून शेगावसाठी विशेष निधीची तरतूद व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय महामार्गाची गुणवत्ता आणि अंतर्गत वाहतुकीचे नियोजन दौरा संपल्यानंतरही कायम राहावे.

Delay in local body elections : खामगाव तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींवर प्रशासक राज!

हा दौरा यशस्वी करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी कंबर कसली आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून हजारो नागरिकांना लाभ होणार असला, तरी शेगावच्या पायाभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लागल्यास ते खऱ्या अर्थाने मोठे यश मानले जाईल.