Ganesh Naik : मंत्रिपद काय चाटायचंय का? नवी मुंबईतील भूखंड वाटपावरून गणेश नाईकांचा संताप

ganesh-naik-criticizes-urban-eknath-shinde-navi-mumbai-land-allocation-row : नगरविकास खात्यावर थेट निशाणा, एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

Mumbai: नवी मुंबईतील भूखंड वाटपाच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी आघाडीत पुन्हा अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथे आयोजित जनता दरबारात नगरविकास खात्यावर जोरदार टीका करत अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. नवी मुंबईकरांच्या हितासाठी मागवलेले भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, “जर जनतेसाठी काम करता आलं नाही तर मंत्रीपद काय चाटायचंय का?” असा संतप्त सवालही उपस्थित केला.

वाशी येथील जनता दरबारात बोलताना नाईक यांनी सिडको आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांवरही टीका केली. हॉस्पिटल, बाग, शाळा आणि इतर सार्वजनिक सुविधांसाठी भूखंडांची मागणी करण्यात आली होती; मात्र ते भूखंड उपलब्ध करून देण्याऐवजी काही दलालांमार्फत बिल्डरांना देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “मी ज्या मंत्रिमंडळाचा भाग आहे, त्या मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याच्या लोकांनी हे कर्मदरिद्री काम केले आहे. मला याची लाज वाटते,” असे ते म्हणाले.

Reality of unemployment : एमबीए, एमसीए आणि अभियंते पोलीस शिपाई भरतीसाठी रांगेत !

नगरविकास खाते सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने या वक्तव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. नाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नवी मुंबईकरांच्या हितासाठी मागितलेले भूखंड परत मिळाले तरच त्यांचा राग शांत होईल. त्यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्र्यांकडे ते याबाबत पाठपुरावा करणार असून सिडको आणि एमआयडीसीमार्फत जनतेच्या विकासासाठी आवश्यक भूखंड उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करणार आहेत.

“मंत्रीपद पक्षाने दिलं आहे, त्याबद्दल मी आभारी आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की मी जनतेच्या प्रश्नांवर मुका होऊन बसू. गणेश नाईक आमदार आणि मंत्री झाला तो जनतेसाठी काम करण्यासाठी. जर तेच करता आलं नाही तर मंत्रीपदाचा उपयोग काय?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. पक्षशिस्त आणि प्रशासनाची शिस्त पाळणारा कार्यकर्ता असल्याचे सांगतानाच जनतेच्या हितासाठी आवाज उठवणे हे आपले कर्तव्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Devendra fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आठवडाभरात दुसऱ्यांदा दिल्लीत!

नवी मुंबईतील भूखंड वाटपाचा मुद्दा यापूर्वीही चर्चेत आला होता. आता पुन्हा नाईक यांच्या आक्रमक भूमिकेमुळे शिंदे-नाईक वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकरणावर नगरविकास खात्याकडून अधिकृत प्रतिक्रिया येते का आणि पुढे कोणती पावले उचलली जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.