water-lever-increasing-lonar-lake-assembly-discussion-scientific-survey-decision : तातडीने ठोस उपाययोजनांची मागणी, वैज्ञानिक सर्वेक्षण होणार
Mehkar जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाणीपातळी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने वाढत असल्याने परिसरातील प्राचीन मंदिरे व ऐतिहासिक वास्तूंवर पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे करण्यात आली.
महाराष्ट्र विधानसभेच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नियम १०५ अंतर्गत ही लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे, सरोवरातील पाणीपातळी सुमारे २० ते २५ फूटांनी वाढल्याने परिसरातील कमळजा माता मंदिर, गोमुख धारा आणि इतर अनेक प्राचीन मंदिरे पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही स्थिती कायम राहिल्यास जगप्रसिद्ध सरोवराचे मूळ स्वरूप बदलून ते सामान्य तलावासारखे होण्याची भीती व्यक्त होत असून पर्यटनासह स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसू शकतो.
दरम्यान वाढत्या पाणीपातळीच्या निषेधार्थ २८ जानेवारी २०२६ रोजी लोणार शहर बंद ठेवण्यात आले होते. तसेच सरोवराचा नैसर्गिक समतोल राखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार जानेवारी २०२६ मध्ये अमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र या समितीत स्थानिक लोकप्रतिनिधी, अभ्यासक व संशोधकांचा समावेश नसल्याने स्थानिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचेही खरात यांनी लक्षवेधी सूचनेत नमूद केले.
Ajit Pawar NCP : जिल्हाध्यक्षांना जाग आली, अचानक ५१ लोकांची कार्यकारीणीच जाहीर केली!
या विषयावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत सांगितले की, लोणार सरोवरातील पाणीपातळीत झालेली वाढ ही प्रामुख्याने नैसर्गिक कारणांमुळे झाली आहे. वन संवर्धन किंवा व्यवस्थापनाच्या दृष्टीने कोणताही मानवी हस्तक्षेप करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सन २०२० मध्ये सरोवराचे पाणी गुलाबी रंगाचे झाल्याची घटना देखील नैसर्गिक स्वरूपाची असल्याचे त्यांनी सांगितले.
सरोवरातील वाढती पाणीपातळी ही पाण्याच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये झालेल्या बदलांचे संकेत असू शकतात. विविध झऱ्यांमधून, विशेषतः गायमुख, सीताकुंड, रामगया आणि पापहरेश्वर परिसरातील गोड्या पाण्याच्या झऱ्यांमधून होणाऱ्या अतिरिक्त प्रवाहामुळे सरोवरातील पाण्याचा सामू व धारणा कमी होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मागील काही वर्षांतील अतिवृष्टी आणि भूगर्भातील बदलांमुळेही पाणीपातळी वाढल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सरकारने स्पष्ट केले. यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या माध्यमातून जलभूभौतिक सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यानंतरच्या अहवालाच्या आधारे पुढील उपाययोजना निश्चित केल्या जाणार आहेत.
सरोवराच्या पाणीपातळीवर आणि पाण्याच्या गुणवत्तेवर सतत लक्ष ठेवण्यासाठी तलाव पातळी निरीक्षण प्रणाली आणि पाणी गुणवत्ता निरीक्षण प्रणाली बसविण्यास जिल्हा नियोजन समिती, बुलढाणा यांनी प्रशासकीय मान्यता दिली असून ही कामे सध्या प्रगतीपथावर असल्याची माहितीही सरकारकडून देण्यात आली.
Sudhir Mungantiwar : महिलांच्या सक्षमीकरणासाठी फक्त शब्द नव्हे, ठोस धोरणे आवश्यक!
जगभरात उल्कापातामुळे निर्माण झालेल्या दुर्मिळ सरोवरांपैकी एक असलेल्या लोणार सरोवराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी वन विभाग कटिबद्ध असून जिल्हा प्रशासन, वन्यजीव विभाग तसेच आयआयटी मुंबई यांच्या समन्वयातून आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय उपाययोजना करण्यात येत असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.








