sanjay-shirsat-allegation-against-imtiaz-jaleel-in-nashik-tcs-conversion-case-nida-khan-arrest : निदा खानला संभाजीनगरात एमआयएमने आश्रय दिल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील कथित लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मुख्य आरोपी निदा खान हिच्या अटकेनंतर आता या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे. सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप करत या संपूर्ण प्रकरणात त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय देण्यात आला होता आणि त्यामागे एमआयएमशी संबंधित लोकांचा हात असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे.
नाशिकमधील टीसीएस कंपनीशी संबंधित या प्रकरणात महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, मानसिक छळ, सक्तीने धर्मांतराचे प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे आणि विनयभंग यांसारख्या गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू असून फरार असलेली मुख्य आरोपी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजीनगरमधील नरेगाव परिसरातील कैसर कॉलनी येथील एका फ्लॅटमधून अटक करण्यात आली.
निदा खानच्या अटकेनंतर संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक गंभीर आरोप केले. “मार्च महिन्यापासून निदा खान फरार होती. दीड ते दोन महिने ती नेमकी कुठे होती याचा तपास झाला पाहिजे. ती संभाजीनगरातील ज्या भागात लपून बसली होती तो परिसर झोपडपट्टी क्षेत्र असून तिथे अमली पदार्थांचे व्यवहार चालतात. निदा खान एकटी नव्हती, तिच्यासोबत तिची आई आणि मावशी देखील होत्या,” असे शिरसाट म्हणाले.
Tamilnadu politics : तमिळनाडूत टीव्हीकेच्या १०८ आमदारांच्या सामूहिक राजीनाम्याची चर्चा !
यावेळी त्यांनी थेट एमआयएम आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला. “निदा खानला एमआयएमकडून सहकार्य मिळाले. इम्तियाज जलील यांनी याआधीही सार्वजनिकरीत्या तिच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. त्यांनी पत्रकार परिषद घेत निदा खानला उघड पाठिंबा दिला होता. त्यामुळे या प्रकरणात इम्तियाज जलील यांची देखील चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
संजय शिरसाट यांनी या संपूर्ण प्रकरणामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोपही केला. “धर्मांतर, मुलींना फसवणे आणि हिंदूंविरोधात द्वेष निर्माण करण्याचे प्रकार संघटित पद्धतीने सुरू आहेत. निदा खान ही फक्त एक मोहरा आहे. महाराष्ट्रभर या जाळ्याचे धागेदोरे पसरलेले आहेत. पुणे, संभाजीनगर आणि इतर शहरांमध्ये अशा प्रकारच्या हालचाली वाढल्या आहेत,” असा दावा त्यांनी केला.
तसेच बेरोजगार तरुणांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आणि महागड्या बाईक्स कशा येतात, याची चौकशी झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. “२२ ते ३० वयोगटातील तरुणांना विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामागे पैसा कुठून येतो? विदेशी निधीचा वापर होतो का? याचा तपास झाला पाहिजे,” असे ते म्हणाले.
Nashik tcs case : सूत्रधार निदा खान अखेर अटकेत, विदेशी फंडिंग, आंतरराष्ट्रीय जाळ्याचा तपास वेगात
दरम्यान, या प्रकरणात एसआयटी चौकशी अधिक व्यापक करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. निदा खानच्या अटकेनंतर आता तपास यंत्रणांकडून तिचे आर्थिक व्यवहार, मोबाईल डेटा, संपर्क जाळे आणि संभाव्य राजकीय संबंध यांची चौकशी सुरू असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








