Vijay Vadettiwar attacks Mangeshkar family again : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सातवा माळा मंगेशकर कुटुंबीयांसाठी राखीव का?
Nagpur : दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घडनेबद्दल काल (११ एप्रिल) आलेला जो तिसरा अहवाल आहे, तो मन हेलावून लावणारा आहे. अहवालानुसार वेळीच त्या माऊलीवर उपचार झाला असता, तर तिचा जीव वाचला असता. मी मंगेशकर रुग्णालय आणि मंगेशकर कुटुंबीयांबद्दल वक्तव्य केलं, तर माझ्यावर टीका झाली. पण मला त्याची काही चिंता नाही, असे काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
नागपुरात आज (१२ एप्रिल) विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या खाबुगिरीची अनेक उदाहरणे देता येतील, असे ते म्हणाले. यावेळी खालील काही उदाहरणे त्यांनी सांगितली.
१. प्रकाश आमटे हे थोर समाजसेवक. त्यांना कर्करोग झाल्यावर दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकाश आमटे यांच्याकडून एकही रुपयाही आम्ही घेणार नाही, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते. नंतर उपचार सुरू झाले. बाहेरून औषधी मागवण्याच्या नावाखाली पाच लाख रुपये मागितले गेले. महाराष्ट्र भूषण, थोर समाजसेवकालाही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सोडले नाही. तर त्या साधारण कुटुंबाची काय मजाल ?
२. विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी नागपुरात मोफत गायन करण्याचे आश्वासन दिले होते. साहित्य संघाने तयारी करून त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा तिथून निरोप आला की, पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची सोय करा. स्पेशल फ्लाईट करून द्या. त्यासाठी 22 लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला. हे पैसे चेकने देण्याची तयारी विदर्भ साहित्य संघाने दर्शवल्यानंतर मंगेशकर यांनी पैसे चेकने नाही, तर कॅश द्या असे म्हटले. विदर्भ साहित्य संघाने आम्ही संस्था असल्याने कॅश पैसे देणे शक्य नाही, असे सांगितले. त्यानंतर लता मंगेशकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हृदयनाथ मंगेशकर जे सांगत आहे, तसेच करा, असे सांगितले. अखेर तो कार्यक्रम रद्द करावा लागला.
३. एका खासदाराने साहित्य संमेलनात येण्यासाठी लता मंगेशकर यांना निमंत्रण दिले होते. तेव्हा त्यांनी संमेलनात येण्यासाठी दोन लाख रुपये मागितले. त्या खासदाराने ते पैसे दिले. कार्यक्रमाची तारीख जवळ आली तेव्हा ऐन वेळेवर आणखी तीन लाख रुपये मागितले गेले. त्यानंतरही कार्यक्रमात येण्यासाठी पैशाच्या मागणीवर त्या अडून राहिल्या.
Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ !
४. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सातवा माळा मंगेशकर कुटुंबीयांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. हे धर्मदाय रुग्णालय असूनसुद्धा तपासणीसाठी वीस रुपयांऐवजी 600 रुपये घेतले जातात. ही लूट नाही का? सातवा माळा मंगेशकर कुटुंबीय आणि त्यांच्या जवळच्या लोकांसाठी राखीव का ठेवण्यात आला?
५. जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर गायनाचा कार्यक्रम ठरला होता, ते निमंत्रण आशा भोसले यांच्यासाठी होते. लता मंगेशकर यांना निमंत्रण नव्हते. मात्र लता मंगेशकर यांनी तिथे गायन केलं. तिथेही मानधन घेऊन गायन केलं. नेहरूंसमोर केलेले गायन मोफत नव्हते.
Vijay Wadettiwar : बीडमध्ये चोरट्यांचा कहर, चक्क गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईल फोन चोरला !
दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आमदाराच्या सहायकाकडून दहा लाख रुपये मागत असेल. तर हे रुग्णालय धर्मदाय कसे, असाही सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. केवळ पैसे दिले नाही म्हणून उपचार न करून एका माऊलीचा जीव घेणाऱ्यांना सरकारने सोडू नये, मग तो कितीही मोठा माणूस असू दे. त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचेही ते म्हणाले.