Complaints will be resolved within fifteen days : आमदार महाले यांचा दावा, चिखली नगर परिषदेत ‘लोकसंवाद’
Buldhana चिखली शहरातील नागरिकांच्या तक्रारींचा पुढील १५ दिवसांत निपटारा केला जाईल, असा दावा आमदार श्वेता महाले यांनी केला आहे. चिखली नगर परिषदेमार्फत आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून नगर परिषद हद्दीतील नागरी समस्या समजून घेण्यात आल्या. नागरिकांनी थेट आपल्या तक्रारी आमदारांकडे लेखी स्वरूपात दिल्या. या सर्व तक्रारींची कार्यवाही येत्या पंधरा दिवसांत केली जाईल, असे आमदार श्वेता महाले यांनी यावेळी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्वेता महाले होत्या. नगर परिषदेचे श्री. अर्जुन इंगळे यांनी प्रास्ताविक केले. नगर परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमात वारसा पद्धतीने दोन व्यक्तींना आमदारांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. महिलांना ‘स्वच्छता दूत’ म्हणून सक्रिय करण्याची सूचना आमदार महाले यांनी दिली.
Shweta Mahale : बुलढाण्यातही आमदारांच्या घरापुढे पेटवले टेंभे!
पाणीपुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक असावे, झाडांच्या फांद्या व कचऱ्यामुळे होणारा त्रास, सार्वजनिक स्वच्छता यासारख्या प्रश्नांवरही चर्चा झाली. झाडांचे कचरे इतरांच्या दारात पडू नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश पोलिस निरीक्षक संग्राम पाटील व मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांना दिले.
या उपक्रमाचा पुढचा टप्पा ६ मे रोजी पंचायत समिती कार्यालय, चिखली येथे पार पडणार आहे. यावेळी ग्रामीण मतदारसंघातील नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर उपाय सुचवले जातील, अशी माहिती आमदार कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला तहसीलदार संतोष काकडे, ठाणेदार संग्राम पाटील, नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत बिडकर, विजय कोठारी, सुरेश खबुतरे, डॉ. प्रतापसिंग राजपूत, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, शंतनु बोन्द्रे, सागर पुरोहित, रामदास देव्हडे, स्वाती सावजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.