Nagpur Municipal Corporation faces the challenge of allocating leases : पट्टे वाटपाचे टेन्शन; 20 मे पर्यंत धडक मोहीम
Nagpur सुप्रीम कोर्टाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पण आता सरकारने दिलेली कामे निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. त्यामुळे राजकीय कार्यकर्तेच नाही तर प्रशासनही जोरदार कामाला लागले आहे.
शहरातील झोपडपट्टी वसाहतीतील रहिवाशांना घराच्या जमिनीच्या पट्टे वाटपासाठी मुख्यमंत्री सचिवालयाच्या निर्देशामुळे प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तोंडावर लवकरात लवकर पट्टे वाटप करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे. महानगरपालिकेच्या पट्टे वाटप कक्षाच्या वतीने झोपडपट्टी भागांमध्ये ५ मे ते २० मे पर्यंत पट्टे वाटपासाठी शिबिरांचे आयोजन करून धडक मोहीम राबविणे सुरू झाले आहे.
नागपुरातील झोपडपट्टी मालकी पट्टे वितरण प्रक्रियेवर थेट मुख्यमंत्री सचिवालयाकडून देखरेख ठेवली जात असून प्रत्येक आठवड्यात बुधवारी विशेष कार्यकारी अधिकारी आशा पठाण याबाबत सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक घेऊन आढावा घेत आहेत.
Operation Sindoor : सामान्यांना इजा न होऊ देता मोडले दहशतवादाचे कंबरडे !
महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, नझूल, महसूल विभाग, नगररचना विभाग, नगर भूमापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित राहत आहे. नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर महानगर पालिका, जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत नझूल व महसूल विभागाच्या वतीने त्यांच्या जमिनीवर वसलेल्या पात्र झोपडपट्टीवासीयांना पट्टे वाटप करण्यात येत आहे.
या पट्टे वाटप प्रक्रियेत आता पर्यंत ८ हजार ५०० झोपडपट्टीवासीयांना पट्टे मिळून ते जमिनीचे मालक झालेले आहेत. शहरात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगरपालिका मिळून ७६६७ पट्ट्यांचे वितरण करण्यात आलेले आहे. नझूल कार्यालयाकडून सुमारे हजारावर पट्ट्यांची नोंदणी झाल्याचा अंदाज आहे.
सुधार प्रन्यासतर्फे ५५७१ पट्टे वाटप झालेले असून महानगर पालिकेकडून २०९६ पट्टे वितरित झालेले आहेत. या दोन्ही विभागांनी पट्टे वाटपाचे लक्ष्य ५० टक्क्यांहून अधिक पूर्ण केलेले आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांतील १०७४७ रहिवासी पट्ट्यांसाठी पात्र असताना त्यापैकी ५५७१ झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप झालेले असून महानगरपालिकेच्या वस्त्यांमध्ये ४८६५ पैकी २०९६ रहिवाशांना भाडेपट्टा पंजिबद्ध करून देण्यात आला आहे.