Raut Vs Fadnavis : मुंबई लुटणारे तुमच्याच सरकारमध्ये, जनता माफ करणार नाही !

Sanjay Rauts scathing attack on Fadnavis ;संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला

Mumbai : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दहीहंडीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मुंबई – ठाणे लुटणाऱ्यांची हंडी फोडली या वक्तव्याला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊतांनी फडणवीसांवर थेट आरोप करताना म्हटलं की, मुंबईला लुटणारे तुमच्याच सरकारमध्ये आहेत. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही.

पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, आमच्या काळात मुंबई महापालिकेत 90 हजार कोटींच्या ठेवी ठेवल्या गेल्या. जर आम्ही मुंबई लुटली असती, तर एवढ्या मोठ्या ठेवी कशा ठेवता आल्या असत्या? उलट तुम्हीच या ठेवींची लूट केली आहे. राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत, मात्र दोन लाख कोटींच्या कामांवर 25 टक्के कमिशन तुमच्या लोकांपर्यंत पोहोचले आहे. यामध्ये फडणवीसांचे लोकही आहेत.

Local body election : आपलं कोणी शत्रू नाही, पण सगळीकडे युती शक्य नाही !

राऊतांनी फडणवीसांना थेट इशारा देत म्हटलं, खरे लुटारू तुमच्याच सरकारमध्ये आहेत आणि तुम्ही त्यांनाच पाठीशी घालत आहात. जे चोर, लफंगे आणि दरोडेखोर तुमच्या आसपास आहेत, त्यांना संरक्षण देऊ नका. अन्यथा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. जे हंडीतील दही-लोणी ओरबाडून खात आहेत, त्यांच्याच हंड्या तुम्ही फोडत आहात, त्याला काय म्हणायचं?

यावेळी राऊतांनी उद्योगपती गौतम अदानींचा मुद्दाही उपस्थित केला. ही मुंबई कोण लुटत आहे? धारावीपासून मुंबईतील अनेक महत्त्वाचे भूखंड अदानींच्या घशात घालण्याचं काम तुम्ही करत आहात. अदानीच्या हंडीतली मलाई खाणारी लोकं हीच आहेत आणि तरीही आमच्यावर लुटीचा आरोप करत आहात, हा सर्वात मोठा जोक आहे, असा टोला त्यांनी लगावला.

इतकंच नव्हे, तर राऊतांनी देवेंद्र फडणवीसांची तुलना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली. “ट्रम्पनंतर जर राजकारणात कुणी जोकर असेल, तर ते देवेंद्र फडणवीस आहेत, असे राऊतांनी म्हटले.

Jigao Project : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची नदीत उडी, दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

राऊतांच्या या तीव्र हल्ल्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वादंग निर्माण झाला असून, आगामी महापालिका निवडणुकांची रणधुमाळी आता अधिकच रंगायला सुरुवात झाली आहे.