‘त्रिशूळ’ आंदोलनातून प्रशासनाला थेट इशारा, मागण्या पूर्ण करण्याची मागणी
Wani : गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेकोली बाधितांच्या प्रश्नांवरून आता जनक्षोभ तीव्र होत असल्याचे चित्र समोर आले आहे. शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी विधानपरिषद आमदार तथा शिवसेनेचे विदर्भातील नेते बच्चू कडू यांनी वेकोली प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे, असा इशारा त्यांनी आंदोलनादरम्यान दिला.
वेकोली बाधितांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी साखरा येथे त्रिशूळ पूजन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी सुमारे १४ किलोमीटरचा पायी प्रवास केला. या आंदोलनाचा समारोप घुग्घुस येथील कारगिल चौक परिसरातील वेकोली रेल्वे सायडिंगजवळ करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना 5 हजारांची मनीऑर्डर!
या ठिकाणी त्रिशूळ उभारून वेकोली प्रशासनाच्या भूमिकेविरोधात निषेध नोंदविण्यात आला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर ठोस निर्णय होत नसल्याने बाधित नागरिकांमध्ये नाराजी असल्याचा मुद्दा आंदोलकांनी उपस्थित केला. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने स्थानिक नागरिक आणि प्रकल्पग्रस्त सहभागी झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
वेकोलीच्या विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असल्याचा आरोप आंदोलनादरम्यान करण्यात आला. संबंधित प्रश्नांवर निर्णय घेण्यास होणारा विलंब, बाधितांच्या हक्कांबाबतची अनिश्चितता आणि स्थानिक कामगारांच्या मागण्या या मुद्द्यांवरून प्रशासनाला जाब विचारण्यात आला.
२५ वर्षांपासून प्रश्न प्रलंबित राहणे ही बाधितांसाठी चिंतेची बाब असल्याचे सांगत, आता केवळ आश्वासनांवर समाधान मानले जाणार नसल्याची भूमिका बच्चू कडू यांनी मांडली. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
अभिजित वंजारींच्या पाठीत खंजीर; काँग्रेस नेत्याच्या कॉलेजमध्ये भाजपची बैठक
या आंदोलनात बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली धीरज राजूरकर, अनित उलमाले, चंद्रकांत घुगुल, निलेश परगंटीवार, विक्रांत चचडा, निलेश बेलेकर, राहुल पारखी आणि विजय गेडाम सहभागी झाले. तसेच प्रहारचे सतीश देरकर, रघु कारेकर आणि मोबीन शेख यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. वेकोली बाधितांच्या प्रश्नांवरून उभारण्यात आलेल्या या आंदोलनामुळे परिसरातील प्रलंबित मागण्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता वेकोली प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
___








