Black bull protest by Farmer’s Organization : अनोख्या आंदोलनाने वेधले महाराष्ट्राचे लक्ष, संपूर्ण कर्जमाफीची मागणी
Akola महाराष्ट्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे काळा बैल पोळा धरने आंदोलन शुक्रवारी, २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुर्तीजापूर तहसील कार्यालयासमोर केले. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.
संघटनेने शेतकऱ्यांना दिलेल्या आवाहनात म्हटले आहे की, “आपल्या हक्कांसाठी, पीक विमा, ओला दुष्काळ, शेतमालाला हमीभाव यांसारख्या मागण्यांसाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ताकद दाखवावी.” शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राबविण्यात येणाऱ्या या आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ओल्या दुष्काळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने जाहीर केलेल्या मदतीत विलंब होत आहे. पीक विम्याचे हप्ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. त्यातच बाजारभाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे कापूस व सोयाबीनसारख्या पिकांना हमीभाव मिळावा, यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे.
Eknath Shinde Shivsena : निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना सूटी, सक्रिय नेत्यांना मिळणार संधी?
संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. काळा बैल पोळा या पारंपरिक प्रतीकांद्वारे शेतकऱ्यांचा रोष सरकारसमोर मांडला आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासन फक्त घोषणा करून थांबत असून प्रत्यक्षात दिलासा देण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे या आंदोलनाद्वारे सरकारला इशारा देण्यात येणार आहे. तहसील कार्यालयासमोर झालेल्या या धरने आंदोलनासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
प्रमुख मागण्या :
संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ करावी.
ओला दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टर ५० हजार रुपये मदत जाहीर करावी.
रद्द करण्यात आलेली पिक विमा योजना २०२५ पर्यंत पूर्ववत ठेवावी.
२०२३ व २०२४ पर्यंतच्या पिक विम्याचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावेत.
कापूस पिकास १० हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा.
सोयाबीनसाठी ६ हजार रुपये प्रति क्विंटल दर जाहीर करावा.








