व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र मध्यरात्री मुख्यमंत्र्यांचे ठोस आश्वासन; अखेर आंदोलन मागे

मध्यरात्री मुख्यमंत्र्यांचे ठोस आश्वासन; अखेर आंदोलन मागे

शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय भूसंपादन नाही!

 

Ashti : प्रस्तावित स्टील प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनाविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या १३ गावांतील शेतकऱ्यांनी अखेर मध्यरात्री आपले आंदोलन मागे घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि अंधारात ठेवून कोणतीही भूसंपादन प्रक्रिया राबविली जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित करण्यास सहमती दर्शविली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सी वरील वाहतूक कोंडी संपुष्टात येऊन मार्ग पुन्हा सुरू झाला.

चामोर्शी तालुक्यातील येणापूर – जयरामपूर परिसरात प्रस्तावित असलेल्या स्टील प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनातून आपल्या जमिनी वगळण्यात याव्यात, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी २ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर आष्टी येथे महामार्गावर चक्काजाम आणि ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. सलग दोन दिवस शेतकऱ्यांनी महामार्गावर ठाण मांडल्याने चंद्रपूर, गडचिरोली आणि दक्षिण गडचिरोलीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. प्रवासी आणि वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्वासनही धुडकावले; आष्टीत शेतकऱ्यांचा चक्काजाम कायम!

 

आंदोलनादरम्यान पावसाची तमा न बाळगता शेतकरी महामार्गावरच मुक्कामाला होते. आंदोलनस्थळीच जेवण तयार करून त्यांनी आपला लढा सुरू ठेवला. भूसंपादनाच्या प्रक्रियेबाबत स्पष्टता मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. त्यामुळे प्रशासनासमोरही आंदोलन मिटविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.

स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आंदोलनस्थळी मध्यस्थी करत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार त्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांनी मध्यरात्री आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश आंदोलकांपर्यंत पोहोचविला. सकारात्मक चर्चेनंतर शेतकऱ्यांनी मध्यरात्री १२ वाजता आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर शेतकरी ठाम; आष्टीत महामार्ग रोखून सरकारला थेट आव्हान!

मुख्यमंत्र्यांशी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष चर्चा होईपर्यंत संबंधित भूसंपादन प्रक्रिया पूर्णपणे स्थगित ठेवण्यात आली आहे. सध्या या प्रक्रियेवर कोणतीही कार्यवाही सुरू नसल्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल आणि जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

आंदोलन मागे घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाने आंदोलक शेतकऱ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचविण्याची व्यवस्था केली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. दोन दिवस चाललेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. मात्र, भूसंपादनाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी होणारी प्रत्यक्ष चर्चा आणि त्यातून निघणारा अंतिम निर्णय याकडे आता १३ गावांतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

____

 

error: Content is protected !!