Allegations of irregularities in the household appliance distribution scheme : गृहपयोगी संच वाटप योजनेत गैरव्यवस्था, बांधकाम कामगारांमध्ये असंतोष
Amravati बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या गृहपयोगी संच वाटप योजनेत गंभीर गैरव्यवस्था होत असल्याचा आरोप करत प्रहार संघटनेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. “जिल्ह्यातील इतर तीन वितरण केंद्रे तातडीने सुरू करावीत, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने संचांचे वितरण करू,” असे ते म्हणाले.
या योजनेत कामगारांना ऑनलाईन नोंदणी करताना केंद्र निवडण्याची मुभा असली, तरी प्रत्यक्षात केवळ नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा येथेच संचांचे वितरण करण्यात येत आहे. परिणामी, ३ व ४ सप्टेंबरला संच न मिळालेल्या कामगारांसह ८ सप्टेंबरला नोंदणी केलेले हजारो कामगार दाभा येथे जमा झाले होते. यामुळे प्रचंड गर्दी होऊन परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. कामगारांना तब्बल १६ तास रांगेत उभे राहावे लागल्याने त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करावा लागला होता.
संच वाटपाचे कंत्राट एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आले असून तो राज्यातील एका वरिष्ठ नेत्याचा निकटवर्तीय असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. यापूर्वीच्या कामात तोटा झाल्याने पुन्हा त्यालाच कंत्राट देण्यात आले, अशी चर्चा असून त्यामुळे संचाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच, एकाच केंद्रावर वाटप करून खर्च वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही होत आहे.
या संपूर्ण गैरसोयीबद्दल प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन देऊन, “एकाच ठिकाणी कामगारांना बोलावल्याने होणाऱ्या गोंधळाची जबाबदारी प्रशासनावर आहे. जिल्ह्यातील इतर केंद्रे सुरू न झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीने वाटप करू,” असा स्पष्ट इशारा दिला.
Local Body Elections : नागपुरात ओबीसी, अकोल्यात महिला आरक्षण, अधिसूचना निघाली
कामगार संघटनांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, जिल्ह्यातील कामगारांना दिलासा मिळावा यासाठी तालुका स्तरावर वाटप केंद्रे सुरू करून योग्य व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.