Serious allegations of giving supari to Rashmi Bagal : रश्मी बागलांनी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप
Solapur : करमाळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांच्या भावावर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर आज सकाळी शेतात जात असताना हल्ला झाला. या हल्ल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस तपासाला सुरुवात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिवरवाडी परिसरात सकाळी महेश चिवटे शेतात गेल्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात महेश चिवटे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत माने घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी पंचनामा आणि सखोल चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात महेश चिवटे यांनी धक्कादायक आरोप करत म्हटले आहे की, हा हल्ला दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांनी दिलेल्या सुपारीवरून करण्यात आला.
Vanchit Bahujan Aghadi : रुग्णांची लुट थांबवा, नाहीतर तोडफोड आंदोलन
दिग्विजय बागल हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवार होते, तर त्यांची बहिण रश्मी बागल कोलते या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. या आरोपामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
राजकीय पार्श्वभूमी पाहता, महेश चिवटे आणि बागल कुटुंब यांच्यातील मतभेद मागील काही महिन्यांपासून सुरू होते. निवडणुकीच्या काळात हे वाद वाढले असून, आता त्याचाच परिणाम या हिंसक घटनेत झाला असल्याचे सूत्रांकडून समजते. काही दिवसांपूर्वीही या दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता, मात्र परिस्थिती सध्या अधिक गंभीर झाली आहे.
Heavy rain : जि.प.चे साडेचार हजार कर्मचारी पूरग्रस्तांसाठी देणार एक दिवसाचे वेतन
पोलीसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला असून, हल्ल्याचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार, हल्लेखोर मोटारसायकलवरून आले होते आणि त्यांनी धारदार शस्त्राने चिवटे यांच्यावर हल्ला केला. सध्या महेश चिवटे यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
Local Body Elections : भाजपचे सर्व आक्षेप मान्य; बुलढाणा नगरपरिषद प्रभागरचनेत बदल!
या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
अधिकृत तपासानंतर या प्रकरणातील सर्व तपशील स्पष्ट होणार आहे, मात्र सध्या करमाळ्यात या घटनेचीच चर्चा रंगली आहे.
_____








