Distribution household utensils to construction workers in controversy : बारमध्ये वाटल्या भांड्यांच्या पेट्या, कामगारांमध्ये संतापाची लाट
Motala बांधकाम कामगारांसाठी शासनाने राबविलेल्या संसार उपयोगी भांडे वितरण योजनेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. शासनाच्या कंत्राटदारानेच कामगारांकडून हजार ते दीड हजार रुपये घेऊन रात्रीच्या अंधारात ‘त्या’ बियर बारमध्ये पेट्या वाटल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकारामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप असून, भ्रष्टाचारात राजकीय आश्रय असल्याची चर्चा सुरु आहे.
राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत बांधकाम कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्याची योजना सुरू आहे. परंतु मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवीसह काही गावांमध्ये या योजनेचा ‘भ्रष्टाचाराचा बाजार’ भरल्याचे दिसत आहे. शासकीय शिबिरांत कामगारांकडून ठसे घेऊन, “पेट्या लवकरच मिळतील” असे सांगण्यात आले, मात्र महिन्यांनंतरही वाटप न झाल्याने संशय वाढला.
कामगारांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत, कंत्राटदाराने ठराविक पुढाऱ्यांच्या संगनमताने पैसे घेतल्याशिवाय पेट्या देण्याचे ‘नवीन धोरण’ सुरू केले. पैसे देणाऱ्यांनाच रात्री उशिरा एका बारवर बोलावून पेट्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात येत असल्याची तक्रार कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या प्रकरणावर कामगार अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. काही लाभार्थ्यांना सहा महिने ते दोन वर्षांपासून कीट मिळालेल्या नाहीत. त्यामुळे शासनाच्या योजनेला भ्रष्टाचाराची गळती लागल्याची चर्चा सर्वत्र आहे.
Ladki Bahin Scheme : ‘लाडकी बहिण’च्या ई-केवायसीत सर्व्हरचा खोडा!
३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आणि धामणगाव बढे पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनात श्रीकृष्ण मतकर, सुरेश वाघ, प्रमोद शिंगोटे, मिनाश्री पाटील, श्रद्धा पाटील, अमित इंगळे आदींनी संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. कामगारांच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्या या कंत्राटदारामागे कोणत्या राजकीय मंडळींचे संरक्षण आहे, हा प्रश्न आता जिल्हा प्रशासनासमोर उभा राहिला आहे.