Fake birth certificate : मलकापुरात ७१७ बोगस जन्मदाखले कायमस्वरूपी रद्द!

717 Fake Birth Certificates Permanently Cancelled in Malkapur : ३६० जणांनी दाखले परत केले; जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई, नगरपरिषद व्यवस्थेतील अनियमितता उघड

Malkapur नगर परिषद मलकापूरमधील जन्मनोंदणी विभागातील मोठा घोटाळा अखेर उघड झाला आहे. १,०७७ बोगस जन्मदाखल्यांपैकी तब्बल ७१७ दाखले कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत आदेश जारी केला आहे. या प्रकरणामुळे नगरपरिषदेत चालणाऱ्या नोंद व्यवस्थेतील गंभीर अनियमितता पुन्हा एकदा समोर आली आहे.

१ नोव्हेंबर २०२३ ते २७ जानेवारी २०२५ या कालावधीत नगरपरिषदेत झालेल्या जन्मनोंदींची सखोल तपासणी करण्यात आली. तपासात १,०७७ जन्मदाखले अनधिकृत व नियमबाह्यरीत्या जारी झाल्याचे निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी २१ जुलै २०२५ रोजी सर्व संबंधितांना प्रमाणपत्रे परत जमा करण्याचे आदेश दिले.
मात्र, ठरविलेल्या मुदतीत केवळ ३६० नागरिकांनीच प्रमाणपत्रे परत केली, तर उर्वरित ७१७ जणांनी नोटिसीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आता ही सर्व प्रमाणपत्रे कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

AgriStack Scheme : जिल्ह्यातील एक लाख शेतकरी पीएम किसानच्या लाभाला मुकणार?

सखोल तपासादरम्यान असेही समोर आले की, अनेक नोंदी तहसीलदार किंवा तालुका दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडून केल्या गेल्या होत्या, जे नियमबाह्य आहे. त्यामुळे या सर्व नोंदी बोगस घोषित करण्यात आल्या.
या प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयाने विशेष पथक नेमून वारंवार सूचना व नोटिसा पाठवल्या, तरीही अनेकांनी प्रतिसाद दिला नाही.
७१७ जन्मदाखले रद्द करणे ही मोठी कारवाई असली तरी प्रकरण केवळ इथपर्यंत मर्यादित ठेवू नये, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सूचनांनंतरही अनेकांनी प्रमाणपत्रे परत केली नाहीत. त्यामुळे ही दाखले शैक्षणिक प्रवेश, वारसाहक्क, ओळखपत्रे किंवा अन्य शासकीय व्यवहारांमध्ये वापरली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.