बावनकुळेंची टीका, वानखडेंचा पलटवार; पालकमंत्र्यांनाच ठरवले निष्क्रिय
Amravati अमरावतीच्या राजकारणात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांच्यातील शाब्दिक संघर्ष सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. बावनकुळे यांनी अमरावती दौऱ्यात खासदार वानखडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्याला वानखडे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या वाक् युद्धाची सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे.
अमरावती दौऱ्यावर असताना बावनकुळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत निष्क्रिय लोकांना घरी पाठवून नवनीत राणा यांना पुन्हा अमरावतीच्या खासदार म्हणून निवडून आणू, असा विश्वास व्यक्त केला. सध्या निवडणुकीचे राजकारण नसले तरी निष्क्रिय लोकांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे विधानही त्यांनी केले. या विधानाचा रोख विद्यमान खासदार बळवंत वानखडे यांच्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
बावनकुळे यांच्या विधानावर खासदार वानखडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. अमरावती जिल्ह्याला लाभलेल्या पालकमंत्र्यांमध्ये बावनकुळे हे सर्वाधिक निष्क्रिय असल्याची टीका त्यांनी केली. पालकमंत्री म्हणून बावनकुळे जिल्ह्याप्रती उदासीन असून, त्यांनी आपले दायित्व योग्य प्रकारे पार पाडले नसल्याचा आरोपही वानखडे यांनी केला.
‘मंत्र्यांची ही अवस्था तर सामान्यांचे काय?’; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा
केवळ कोणाला तरी खूश करण्यासाठी माझ्यावर टीका करणे योग्य नाही, असे म्हणत वानखडे यांनी बावनकुळे यांना लक्ष्य केले. ज्यांच्यासाठी बावनकुळे बोलत आहेत, त्यांनीच लोकसभा निवडणुकीच्या वेळी बावनकुळे यांचा अपमान केला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली. कोणाला घरी पाठवायचे आणि कोणाला निवडून द्यायचे, हे जनताच ठरवेल, असे प्रत्युत्तर देत त्यांनी या वादाला नवे वळण दिले.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेमुळे अमरावतीतील राजकीय वातावरणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या शाब्दिक संघर्षाचे राजकीय पडसाद उमटतात का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








