Congress Holds Aggressive Protest Under the Leadership of City President MLA Vikas Thakre : काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आक्रमक आंदोलन
Nagpur : नागपूर शहरातील जनतेच्या वाढत्या समस्या आणि प्रशासनाच्या निष्क्रीयतेच्या विरोधात काँग्रेसने महानगरपालिकेत प्रचंड घोषणाबाजी केली. प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. शहराच्या विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणांनी महानगरपालिकेचा परिसर दणाणून सोडला. यामुळे परिसरात काही काळ तणासदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती.
महानगरपालिकेवर हल्लाबोल करताना आमदार विकास ठाकरे म्हणाले की, महानगरपालिका प्रशासन जनतेपासून पूर्णपणे दूर गेले आहे. शहरातील समाजाच्या प्रत्येक वर्गावर अन्यात होत आहे. सत्ताधारी फक्त आणि फक्त राजकीय स्वार्थ जपण्यात गुंतले आहेत. अशा परिस्थितीत जनतेची अपेक्षा पूर्णपणे प्रशासनाकडून आहे. पण महानगरपालिकेवर बसलेले प्रशासक जनतेच्या प्रश्नांकडे अजिबात लक्ष देत नाहीत. आताही शहरातील समस्या सोडवल्या नाहीत, तर यापुढे याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
Excise duty revenue : उत्पादन शुल्क विभागाचा विक्रमी महसूल १२,३३२ कोटींची कमाई!
वारंवार केल्या जात असलेल्या तक्रारीनंतरही शहरातील समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरात ठिकठिकाणी कचरा साचलेला आहे. ज्यांना कचरा संकलनाचे ठेके दिले आहेत, त्यांच्यावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. पिण्याच्या पाण्याची सोय राहिलेली नाही. विकासाच्या नावावर चांगल्या रस्त्यांची तोडफोड सुरू आहे. बर्डीतील हॉकर्सची समस्या जैसे थे आहे, या सर्वाचा जाब काँग्रेसने महानगरपालिका प्रशासनाला विचारला. आंदोलनाच्या वेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. पण पोलिसांचा घेरा तोडून आमदार विकास ठाकरे समर्थकांसह कार्यालयात शिरले आणि तेथेही जोरदार घोषणाबाजी केली.
महानगरपालिका आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला अखेर चर्चेसाठी बोलावले. पण या चर्चेतही तोडगा निघाला नसल्याचे आमदार ठाकरे यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. आंदोलनात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रशात धवड, प्रमोदसिंग ठाकूर, उमाकंत अग्नीहोत्री, गुलाबराव सोनवने, अनिल पाटील, मिलींद दुपारे, वसीम खान, सुभाष पेंढारकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.








