व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण ५०० कोटींचा ‘ऑडिओ बॉम्ब’! महायुतीत नेमका कोणाचा खेळ सुरू आहे?

५०० कोटींचा ‘ऑडिओ बॉम्ब’! महायुतीत नेमका कोणाचा खेळ सुरू आहे?

जरांगेंच्या कथित आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ; सत्तेच्या राजकारणातील विश्वासार्हतेची कसोटी!

 

Nagpur: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोपांचा धुरळा उडतोय आणि सत्तेच्या सारीपाटावर शह-काटशहाचे डाव रंगत आहेत. मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमधील ५०० कोटी रुपयांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या प्रकरणामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील परस्परविश्वासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.प्रश्न केवळ ५०० कोटींचा नाही; प्रश्न आहे सत्तेसाठी एकत्र आलेल्यांची एकजूट किती खरी आणि जनतेच्या विश्वासाची किंमत कोण मोजणार, याचा!

सत्तेत असताना एकजुटीचा संदेश देणारे नेते अडचणीच्या वेळी एकमेकांकडे बोट का दाखवतात? मित्रपक्षांतील मतभेद उघडपणे समोर येत असतील, तर त्या एकजुटीचा आधार विचारांचा आहे की केवळ सत्तेच्या सोयीचा? या प्रकरणाने महायुतीतील संबंधांबाबत अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. मात्र, कथित ऑडिओ क्लिपची सत्यता, आवाजांची ओळख आणि संभाषणाचा संपूर्ण संदर्भ तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे. आरोप म्हणजे पुरावा नव्हे; त्यामुळे राजकीय सोयीनुसार कुणालाही दोषी ठरवणे चुकीचे आहे. आरोपांत तथ्य असेल, तर निष्पक्ष कारवाई झाली पाहिजे; ते निराधार ठरले, तर आरोप करणाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.

नागपूरमध्ये काँग्रेस नेत्यांचा घोळ, ‘तुझा-माझा’ करण्यात वेळ घालवला

या गदारोळात मराठा आरक्षणाचा मूळ प्रश्न मागे पडता कामा नये. समाजाला राजकीय आरोप-प्रत्यारोप नव्हे, तर स्पष्ट भूमिका, कायदेशीरदृष्ट्या टिकणारा मार्ग आणि ठोस निर्णय हवा आहे. आंदोलनाचे नेतृत्व असो वा सत्ताधारी पक्ष, प्रत्येकाच्या भूमिकेची चिकित्सा तथ्यांच्या आधारे झाली पाहिजे. माध्यमांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. अप्रमाणित दाव्यांना सत्याचा दर्जा देणे किंवा राजकीय सोयीनुसार भूमिका मांडणे पत्रकारितेच्या विश्वासार्हतेला बाधा आणते. माध्यमांचे काम राजकीय कोंडी करणे नव्हे, तर सत्याची पडताळणी करून ते जनतेसमोर मांडणे आहे.

भाजपचे देव पाण्यात; काँग्रेसच्या आरोपांनी राजकीय वातावरण तापले

महागाई, रोजगार, शेती, शिक्षण आणि आरक्षणाचे प्रश्न कायम असताना राजकीय गदारोळच चर्चेच्या केंद्रस्थानी राहणे, ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. या प्रकरणातून कोणाला राजकीय फायदा होतो, यापेक्षा सत्य काय आहे आणि जबाबदारी कोण स्वीकारणार, हे अधिक महत्त्वाचे आहे. ऑडिओचा आवाज थांबेल, राजकीय आरोपांच्या चर्चाही विरतील; पण सत्य समोर आले नाही, तर संशय कायम राहील. महाराष्ट्राला आणखी एक राजकीय तमाशा नको तर सत्य, पारदर्शकता आणि उत्तरदायी नेतृत्व हवे!

___

 

error: Content is protected !!