Nitesh Rane on his own; Deepak Kesarkar’s revelation : नितेश राणे स्वबळावर; दीपक केसरकरांचा खुलासा
Mumbai : राज्यातील 246 नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीत फूट पडली असून भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार नाहीत, हे आता स्पष्ट झालं आहे. याबाबत दीपक केसरकर यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, “पालकमंत्री नितेश राणे महायुती करण्यास इच्छुक नाहीत, त्यामुळेच सिंधुदुर्गात युती शक्य झाली नाही.”
केसरकर यांनी सांगितले की, “मी आणि उदय सामंत यांनी युतीसाठी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. मात्र, पालकमंत्री नितेश राणे यांचा त्यास विरोध असल्याने युती अंतिम होऊ शकली नाही.” त्यामुळे, सिंधुदुर्गात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष आता स्वबळावर लढणार आहेत.
Parth Pawar : पार्थ पवारांच्या करोडोच्या जमीन घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई !
दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नितेश राणे यांनीही स्वबळाचा नारा दिला. “भाजपची ताकद पुरेशी आहे, निवडणुका स्वबळावर झाल्या पाहिजेत. भाजपच्या ताकदीशिवाय कोकणात कोणी आमदार झालेला दाखवा,” असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच, “आपला झेंडा फडकला पाहिजे, हेच प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न आहे,” असंही ते म्हणाले.
सिंधुदुर्गापुरतंच नव्हे, तर राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांमध्येही महायुतीत अंतर्गत मतभेद उघडकीस आले आहेत. रायगड, पुणे, बीड, आणि जळगाव जिल्ह्यांतील स्थानिक नेत्यांनीही स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून आलं आहे.
Local Body Elections : काँग्रेस बंडखोरांना पुरस्कृत करत असेल तर आघाडी कशी टिकवायची ?
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे झालेल्या शिवसेना (शिंदे गट) च्या निर्धार मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. “महायुतीच्या वर्षभराच्या काळात आमदारांना एक फुटकी कवडीही मिळाली नाही,” असा आरोप करत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला. “शिवसेनेच्या पाचही आमदारांनी ठरवलं, तर जळगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसेल. भाजपचे नेते पलटीखोर आहेत, त्यांच्यावर भरोसा ठेवू नका,” असं म्हणत किशोर पाटील यांनी स्वबळाचा नारा दिला.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना, महायुतीतील मतभेद आणि स्वबळाची चळवळ ही राजकीय समीकरणं बदलवणारी ठरण्याची चिन्हं दिसत आहेत. आगामी काही दिवसांत उमेदवारांची घोषणा आणि प्रचार धोरण यातून महायुतीची खरी ताकद कसोटीवर लागणार आहे.
_______








