Investigation underway, 11 dead, over 30 injured : तपासाला गती, ११ मृत, ३० हून अधिक जखमी
Delhi : राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक लोक जखमी आहेत. या घटनेनंतर दोन तासांच्या आत दिल्ली पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे. स्फोटामागे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
स्फोट सोमवारी सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ झाला. पार्किंगमध्ये उभी असलेली आय-ट्वेन्टी कार अचानक उडाली आणि काही क्षणांत आग भडकली. परिसरात मोठा स्फोटाचा आवाज झाला आणि काही वाहने जळून खाक झाली. घटनास्थळी अग्निशमन दल आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ दाखल झाल्या.
Dhantoli Building Scam : नझुल आणि मनपा अधिकाऱ्यांचे बिल्डरशी संगनमत उघड !
स्फोटासाठी वापरलेली गाडी ही हरियाणातील गुरुग्राम नोंदणीची असल्याचं स्पष्ट झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि जखमींना रुग्णालयात भेट दिली. त्यांनी सांगितलं की या स्फोटातील सर्व शक्यता तपासल्या जात असून सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण सुरू आहे.
दरम्यान, या घटनेच्या काही तास आधी हरियाणातील फरिदाबादमध्ये मोठी कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी दोन डॉक्टरांसह सात दहशतवाद्यांना अटक करून ३५० किलो स्फोटक आणि मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. फरिदाबाद मेडिकल कॉलेजमधून ही कारवाई करण्यात आली असून ते ठिकाण दिल्ली स्फोटस्थळापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे. त्यामुळे दोन्ही घटनांमधील संबंध तपासले जात आहेत.
Local Body Elections : उमेदवारांना परवानग्यांसाठी वन विंडो सिस्टीम !
सध्या दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून मेट्रो स्टेशन, प्रमुख बाजारपेठा आणि सरकारी इमारतींमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) या प्रकरणाचा तपास हाती घेण्याची शक्यता आहे. सुरक्षा यंत्रणा सर्व संभाव्य कोनातून तपास करत असून नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिल्ली स्फोटानंतर देशभरात सुरक्षेची कडक खबरदारी घेण्यात आली आहे. राजधानी हादरवून टाकणाऱ्या या घटनेमुळे पुन्हा देशाच्या सुरक्षेवरील प्रश्न ऐरणीवर आले आहेत.
______








