Internal disputes in Congress : सुनील केदारांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना खुले आव्हान !

Sunil Kedar’s open challenge to state president Harshvardhan Sapkal : मुलाखतींना केदार समर्थकांची दांडी, ताकद दाखवण्याचा प्रयत्न

Nagpur : नागपूर जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या समर्थकांनी निवडणूक इच्छुकांच्या मुलाखतींसाठी झालेल्या बैठकीपासून चार हात लांब राहणे पसंत केले. या कृतीने त्यांनी पक्ष नेतृत्वालाच स्पष्ट संदेश दिला आहे. बुधवारी (१२ नोव्हेंबर) झालेल्या मुलाखतीत जिल्हाभरातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांपैकी केदार समर्थकांमधून एकही उमेदवार हजर राहिला नाही.

सुनील केदार यांच्या नेतृत्वात घेतली गेलेली बैठक वादात सापडली होती. केदारांनी घेतलेली जिल्हा काँग्रेसची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अवैध ठरवत अमान्य केली होती. त्यानंतर बुधवारी घेतलेला मुलाखतीचा हा कार्यक्रम म्हणजे पक्ष संघटन व्यवस्थित करण्याचा प्रदेश काँग्रेसचा एक प्रयत्न होता. मात्र केदार गटाने त्याकडे पाठ फिरवली. प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयाला केदारांनी उघड उघड आव्हान दिले असल्याचे मानले जात आहे.

Misappropriation of government land : ताथवडे शासकीय जमिनीच्या गैरव्यवहारात सहदुय्यम निबंधक निलंबित !

विशेष म्हणजे या मुलाखत बैठकीला स्वतः सुनील केदार यांच्यासह काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक आणि ज्येष्ठ नेते सुरेश भोयर हेसुद्धा अनुपस्थित राहिले. त्यामुळे ही अनुपस्थिती केवळ इच्छुकांची नसून जिल्हा नेतृत्वातील प्रमुख गटांची सामूहिक भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Municipal Corporation Elections : तिकीटांसाठी राजकीय चुरस वाढली !

ही संपूर्ण भूमिका केदार गटाच्या दबावतंत्राचा भाग आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आगामी निवडणुका आणि तिकीट वाटप प्रक्रियेत आपले अस्तित्व आणि शक्ती दाखवण्याचा केदारांचा हा पवित्रा आहे. केदार गटाचे इच्छुक गैरहजर राहिल्याने नागपूर काँग्रेसमधील गटबाजी किती तीव्र आहे, याचा पुन्हा प्रत्यय आला. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसमधील हा उघड अंतर्गत संघर्ष पक्ष संघटनेसाठी मोठे आव्हान ठरू शकतो.