व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Eknath Khadse : खडसे भाजपला छुपा पाठिंबा देत असल्याचा आरोप

Eknath Khadse : खडसे भाजपला छुपा पाठिंबा देत असल्याचा आरोप

muktainagar election khadse hidden support bjp allegation : मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत खळबळ

Muktainagar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराला वेग दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत अचानक राजकीय खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मुक्ताईनगरचे माजी आमदार एकनाथ खडसे यांच्यावर काँग्रेसकडून गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांनी भाजपला छुपा पाठिंबा दिल्याची चर्चा जोरात आहे.

मुक्ताईनगरमध्ये काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत रावेर लोकसभेतील सर्व नगरपालिकांमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय खडसे यांच्या नेतृत्वात झाला होता. मात्र, त्यानंतर शेवटच्या क्षणी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक लढवू शकत नसल्याचे जाहीर केल्याने आघाडीतील नेते अचंबित झाले. त्यांचा दावा होता की आमच्याकडे उमेदवार नाहीत, तसेच निवडणुकीसाठी लागणारा निधीही उपलब्ध नाही. खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून असा पवित्रा येणे हेच स्थानिक पातळीवर चर्चेचा मुद्दा बनले आहे.

Amit Thackeray : अमित ठाकरेंनी अचानक अनावरण केलेला शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला

काँग्रेस नेते डॉ. जगदीश पाटील यांनी एकनाथ खडसेंवर आरोप करताना सांगितले की, खडसे हे आपल्या सुनबाई आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या दबावाखाली काम करत आहेत. हा निर्णय महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी आणि भाजपला अप्रत्यक्ष मदत करण्यासाठी घेतल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. मुक्ताईनगरमधील राजकारण गेल्या काही दिवसांपासून वेगळे वळण घेत असून एकेकाळी खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या या ठिकाणी आज आघाडीला उमेदवार शोधण्याची वेळ आल्याने राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत.

subsidy scheme : ब्राह्मण, राजपूत, आर्यवैश्य समाजासाठी महायुती सरकारची मोठी योजना !

या निर्णयाचा परिणाम फक्त मुक्ताईनगरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण रावेर लोकसभा परिसरातील आघाडीच्या रणनीतीवर होणार असल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला याचा फटका बसू शकतो, असे म्हणण्यात येत आहे. या सर्व आरोपांवर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देणे टाळल्याने राजकीय तर्कवितर्कांना अधिकच उधाण आले आहे.

मुक्ताईनगरमधील या अनपेक्षित घडामोडींमुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

______

error: Content is protected !!