Local Body Elections : रवी राणांचा हात पुन्हा ‘भाजप के साथ’!

Ravi Rana extends support to the BJP across Amravati district : अमरावती जिल्ह्यात सर्वत्र भाजपला पाठिंबा

अमरावती : ‘स्वबळाचा नारा’ देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केलेले आमदार रवी राणा यांचा हात अखेर ‘भाजप के साथ’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये भाजपला खुलेआम पाठिंबा देण्याची घोषणा करून राणा यांनी राजकीय समीकरणांमध्ये मोठे वळण आणले आहे. राणांनी आपला स्वाभिमान पक्ष भाजपकडे गहाण टाकल्याची टीका विरोधक करीत आहेत.

स्वाभिमान पक्षाने काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील ४० जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे सांगून स्वबळावर लढण्याची रणनीती आखली होती. अनेक ठिकाणी उमेदवारांची नावे घोषितही करण्यात आली होती. मात्र, अचानक भूमिका बदलत राणा यांनी भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत देण्याची घोषणा केली. उमेदवार असलेल्या ठिकाणीही भाजपच्या विजयासाठी मैत्रीपूर्ण स्पर्धा ठेवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Election Commission : शिक्षक मतदारसंघाच्या यादीत घुसवले बोगस मतदार!

या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणच बदलले असून भाजपसाठी ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. कारण, अमरावती जिल्ह्यातील अनेक नगरपरिषदांमध्ये भाजपविरोधात एकत्रित वातावरण निर्माण होण्याची शक्यता होती. स्वाभिमान पक्ष स्वतंत्र भूमिका घेणार असल्याने भाजपच्या मतात फूट पडण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, राणा यांच्या नव्या भूमिकेमुळे भाजपला थेट लाभ मिळणार आहे.

राणा यांनी युवा स्वाभिमान संघटनेलाही भाजपच्या बाजूने सक्रिय काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण युवा संघटना भाजपच्या प्रचारात उतरल्याने स्थानिक निवडणुकांवर त्याचा प्रभाव दिसू शकतो. विशेषतः ग्रामीण भागातील राणा यांचा प्रभाव असलेल्या प्रभागांमध्ये भाजपला अतिरिक्त बळ मिळेल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील माजी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा या दांपत्याची भाजपशी जवळीक गेल्या काही वर्षांत वाढत आहे. लोकसभा तसेच विविध निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या स्थानिक निवडणुकांमध्येही त्यांनी भाजपची साथ पकडल्याने आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो.

Ajit Pawar : कापूस खरेदीतील तक्रारींचा आचारसंहितेनंतर निर्णय

एकूणच, ‘स्वबळाचा नारा’ देणाऱ्या राणा यांनी पुन्हा एकदा भाजपसोबतची जवळीक वाढवत जिल्ह्यातील निवडणुकीला नवे वळण दिले आहे. भाजपसाठी हा निर्णय फायदेशीर ठरेल, तर राणा यांच्या राजकीय इच्छाशक्ती व स्वाभिमानाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.