Ruling party and opposition are not watching Fadnavis reaction as raid underway : फडणवीसांची प्रतिक्रिया “धाड पडताना सत्ताधारी – विरोधक पाहत नाहीत
Mumbai : सांगोला नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण प्रचंड तापले असून शिंदे गटातील माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर एलसीबी आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने टाकलेल्या धाडीने एकच खळबळ उडाली आहे. धाडीदरम्यान रेकॉर्डिंगही करण्यात आले असून या घडामोडीनंतर सांगोल्यात राजकीय भूकंप झाल्याचे चित्र दिसत आहे. शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड पडल्याने ते क्षणभर भावुक झाले आणि पत्रकारांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. भाजपावर गंभीर आरोप करत त्यांनी ही कारवाई पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्या सांगण्यावरून झाल्याचा दावा केला. भाजपाला सांगोल्यात पराभव दिसत असल्यामुळे पायाखालची वाळू सरकत असून म्हणूनच त्यांच्या कार्यालयावर कारवाई घडवून आणण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला.
याच पार्श्वभूमीवर काल रात्री आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाचीही तपासणी करण्यात आली असून त्यामुळे परिस्थिती अधिकच तणावग्रस्त झाली आहे. निवडणूक प्रक्रियेत निधी आणि साधनसामग्रीच्या वापराबाबत शंका उपस्थित होत असताना शहाजी बापूंनी पूर्वी आपण भाजपाला सातत्याने मदत केली असून आता त्यांच्यावरच कारवाई होत असल्याचे नमूद केले. “मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संपूर्ण माहिती देणार,” असे सांगत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Maharashtra politics : राज ठाकरे सोबत आल्यास भाजपा पराभूत होईल
धाडीवर विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत सत्ताधारी–विरोधक या वर्गीकरणाला फाटा दिला. “कोण सत्तेत आहे आणि कोण बाहेर आहे यावर धाड ठरत नाही. तक्रार आली की कारवाई होते. अनेक वेळा माझी गाडी देखील तपासली जाते. त्यामुळे यामध्ये सत्ताधारी किंवा विरोधक असे काही नसते,” असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या वक्तव्यामुळे ही कारवाई राजकीय दबावाखाली की तक्रारीमुळे झाली याबाबतचे चित्र अद्याप धूसर आहे.
शहाजी बापू भावुक झाल्यानंतर आणि भाजपावर थेट बोट दाखवल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका कोणती राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे गटाला या धाडीनंतर मिळालेला हा सर्वात मोठा धक्का मानला जात असून सांगोला राजकारणात यानंतर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपरिषद निवडणुकीची पार्श्वभूमी, राजकीय आरोप–प्रत्यारोप आणि कारवाईंचा सिलसिला पाहता सांगोला निवडणूक अधिकच चुरशीची होणार यात शंका नाही.
___








