गडचिरोलीतून अधिवेशनावर मोर्चा; नुकसानभरपाई, २४ तास वीज आणि भूसंपादनाचे आदेश रद्द करण्याची मागणी
Gadchiroli : विमानतळ, औद्योगिक वसाहती आणि अन्य विकास प्रकल्पांसाठी सरकारकडून हालचाली सुरू आहेत; मात्र शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारकडे वेळ नसल्याचा आरोप काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला. दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत केवळ दोन तालुक्यांचा समावेश करून उर्वरित शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १ डिसेंबर रोजी गडचिरोली येथून नागपूर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
जिल्ह्यात विमानतळ आणि एमआयडीसीसारखे प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू असताना शेतकऱ्यांच्या भवितव्याबाबत मात्र ठोस भूमिका घेतली जात नसल्याची टीका ब्राह्मणवाडे यांनी केली. शेतकऱ्यांच्या जमिनींच्या भूसंपादनासंदर्भातील आदेश रद्द करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. महिलांच्या कल्याणासाठी विविध योजनांची भूमिका मांडणाऱ्या सरकारने शेतकरी महिलांच्या जमिनींच्या प्रश्नाकडेही गांभीर्याने पाहावे, असे ते म्हणाले. शेतीसाठी चोवीस तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी चुरस; जाधव, देशमुख की भाकरे?
२०२५-२६ या वर्षातील पीक नुकसानभरपाईची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. पाच हजार कोटी रुपयांच्या अग्रीम मदतीच्या घोषणेवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. प्रत्यक्ष मदत वेळेत मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतीच्या प्रश्नांसोबतच बेरोजगारीचा मुद्दाही ऐरणीवर असल्याचे ब्राह्मणवाडे यांनी सांगितले. विविध शासकीय विभागांतील रिक्त पदे तातडीने भरून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
‘अर्थ’कारणावरून महायुतीत पुन्हा खटके, सुनेत्रा पवारांची सावध भूमिका
शेतकऱ्यांना न्याय, रखडलेली नुकसानभरपाई, शेतीसाठी अखंड वीजपुरवठा आणि रोजगार या प्रमुख मागण्यांसाठी नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष शेतकरी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांकडे वेधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
आंदोलनाची घोषणा केली त्यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर पोरेटी, वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, प्रमोद भगत, प्रभाकर मेश्राम, नगरसेवक सतीश विधाते, देवाकर निसार आणि विकास यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
____








