दिवाळीपूर्वी नव्या अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता; महायुतीच्या अंतिम निर्णयाकडे सहकार क्षेत्राचे लक्ष
Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महायुतीने वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची शक्यता वर्तविली जात असली, तरी अद्याप अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत अनिश्चितता कायम आहे. अध्यक्षपदासाठी राजूदास जाधव, खासदार संजय देशमुख आणि स्नेहल भाकरे यांच्या नावांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
जिल्हा बँकेच्या सत्तांतरानंतर अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. सध्या शिंदेसेनेचे राजूदास जाधव यांचे नाव संभाव्य अध्यक्ष म्हणून आघाडीवर असल्याची चर्चा आहे. मात्र, महायुतीच्या नेत्यांकडून अधिकृत घोषणा झालेली नसल्याने त्यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. दुसरीकडे, खासदार संजय देशमुख यांचे नावही अध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे. मात्र, ते हे पद स्वीकारण्यास इच्छुक आहेत की नाही, याबाबत स्पष्टता नाही. अनुभवी संचालक स्नेहल भाकरे यांचाही संभाव्य उमेदवार म्हणून विचार होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या तिन्ही नावांपैकी कोणाच्या पारड्यात अध्यक्षपद पडणार, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
‘अर्थ’कारणावरून महायुतीत पुन्हा खटके, सुनेत्रा पवारांची सावध भूमिका
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी अधिकृत गॅझेट अधिसूचना महत्त्वाची ठरणार आहे. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच निवडणूक प्रक्रियेची तारीख आणि पुढील कार्यक्रम स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. सध्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असल्याने प्रमुख नेते त्या निवडणुकीत व्यस्त आहेत. परिणामी, जिल्हा बँकेतील पदवाटपाचा विषय काहीसा मागे पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच नव्या अध्यक्षांकडे कारभार सोपविला जाणार की निवड प्रक्रिया पुढे ढकलली जाणार, याबाबत संभ्रम कायम आहे. निवडीची तारीख निश्चित नसल्याने संचालकांचेही अधिकृत अधिसूचनेकडे लक्ष लागले आहे.
अध्यक्षपदाच्या निवडीत पालकमंत्री संजय राठोड यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीतील घटक पक्षांचे राजकीय समीकरण, संचालकांचे संख्याबळ आणि नेतृत्वाची पसंती या मुद्द्यांचा विचार करून अंतिम नाव निश्चित होऊ शकते. काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणल्यानंतर जिल्हा बँकेवर महायुतीने मिळविलेल्या वर्चस्वाची खरी दिशा नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीतून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण बाजी मारणार आणि बँकेच्या कारभाराची सूत्रे कोणाकडे जाणार, याकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.








