Local Body Elections : उपाध्यक्ष-सभापतीपदांसाठी मोर्चेबांधणी; पाच नगर परिषदांत राजकीय हालचालींना वेग

Preparations underway for election to Vice-President and Chairman posts : आठवडाभरात अधिसूचना अपेक्षित; काही ठिकाणी सहज, तर काही ठिकाणी रस्सीखेच अटळ

Khamgao नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांना प्रमाणपत्रांचे वितरण झाले असून, नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या कार्यभाराचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आता उपाध्यक्ष व विविध सभापतीपदांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली असून, घाटाखालील पाचही नगर परिषदांमध्ये हालचालींना वेग आला आहे.

खामगाव व नांदुरा नगर परिषदांमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत आहे, तर मलकापुरात काँग्रेसची ताकद भक्कम असल्याने या तीन ठिकाणी उपाध्यक्ष व सभापतीपदांची निवड तुलनेने सुरळीत होण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित नगर परिषदांमध्ये राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची ठरणार आहेत.

Navneet Rana : ‘हिंदूंनीही तीन-चार मुले जन्माला घालावीत’

अपक्षांसह राष्ट्रवादीचा ‘भाव’ वाढणार

जळगाव जामोद नगर पालिकेत भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला असला तरी, बहुमताचा आकडा गाठण्यात पक्ष अपयशी ठरला आहे. २१ नगरसेवकांपैकी भाजपला ९, काँग्रेसला ५, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला २, एमआयएमला २, समाजवादी पक्षाला १, राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला १ आणि अपक्ष १ जागा मिळाल्या आहेत.
या परिस्थितीत भाजपला सत्ता संतुलनासाठी अपक्ष व राष्ट्रवादी (अजित पवार) गटाची मनधरणी करावी लागणार असून, अन्य पक्षांनाही सोबत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अधिसूचनेपूर्वीच डावपेचांना धार

उपाध्यक्ष व सभापतीपदांसाठीची अधिसूचना जाहीर होताच अधिकृत प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र त्याआधीच राजकीय पक्षांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली असून, आगामी काही दिवस नगर परिषदांच्या राजकारणात चांगलीच धुसफूस पाहायला मिळणार आहे.

शेगावमध्ये उपाध्यक्षपद पुन्हा ‘डोकेदुखी’ ठरणार?

शेगाव नगर परिषदेत नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला असला, तरी सभागृहात भाजपचे वर्चस्व आहे. ३० पैकी भाजपचे १५, शिंदेसेनेचे २, तर काँग्रेसचे केवळ ५ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे उपाध्यक्षपद भाजपकडे जाण्याची, तर सभापतीपद शिंदेसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मलकापुरात काँग्रेसचे सर्व पदांवर वर्चस्व

मलकापूर नगर परिषदेत काँग्रेसने ३० पैकी १५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यामुळे उपाध्यक्ष व सभापतीपदे काँग्रेसच्याच वाट्याला जाणार आहेत. मात्र राष्ट्रवादी (अजित पवार) गटासोबत समन्वय झाल्यास त्यांना एखादे सभापतीपद दिले जाण्याची शक्यता आहे.

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर मकोका निश्चित

खामगाव-नांदुरात भाजपची ‘एकहाती’ सत्ता

खामगाव नगर परिषदेत भाजपने ३५ पैकी २८ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे उपाध्यक्ष व सभापतीपदे भाजपच्याच वाट्याला जाणार आहेत. नांदुरा नगर परिषदेतही भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकत सत्ता मजबूत केली आहे.