Akola Municpal Corporation Election : भाजप उमेदवारांची यादी दोन दिवसांत होणार ‘फायनल’!

BJP candidate list to be finalised within two days : प्रभागनिहाय उमेदवारांची लवकरच घोषणा; पक्षश्रेष्ठींकडून मिळणार हिरवा कंदील

Akola अकोला महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व २० प्रभागांतील इच्छुक उमेदवारांची यादी येत्या दोन दिवसांत ‘फायनल’ होण्याची दाट शक्यता आहे. या यादीवर भाजपच्या पक्षश्रेष्ठींची अंतिम मोहोर उमटणार असून, त्यानंतर उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, इच्छुक उमेदवारांचे लक्ष या यादीकडे लागले आहे.

अकोला महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे सर्वाधिक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर प्रभागनिहाय प्रस्ताव तयार करून तो प्रदेशस्तरावर पक्षश्रेष्ठींकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावात महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण २० प्रभागांतील संभाव्य उमेदवारांचा समावेश आहे.

Mehkar Municipal Council : सत्कार सोहळ्यावर काँग्रेस व शिंदेसेनेचा बहिष्कार

सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी काही विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता असून, त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे ‘तिकीट मिळते की कट होते’, याकडे इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांचेही लक्ष लागले आहे. येत्या दोन दिवसांत भाजपची २० प्रभागांतील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याने इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची युती कधी जाहीर होणार, याकडे इच्छुक उमेदवारांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात नागपुरात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष संघटन आणि महापालिका निवडणुकीचा आढावा घेत प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे.

Conflict over candidacy : उमेदवारीवरून भाजपमध्ये संघर्ष उफाळला!

नागपुरात झालेल्या या बैठकीला महायुतीचे मंत्री, प्रमुख नेते आणि प्रदेशस्तरावरील पक्षश्रेष्ठी उपस्थित होते. या बैठकीत युती होणार असल्याचे संकेत देण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात युती कधी जाहीर होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे अकोलेकरांसह राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महापालिका निवडणुकीसाठी युती जवळपास ‘पक्की’ मानली जात असली, तरी दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) बाबत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली जात असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने भाजपविरोधी भूमिका घेतल्यामुळे युतीबाबत साशंकता निर्माण झाली असून, ही युती प्रत्यक्षात आकाराला येते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.