व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola Municipal Corporation Election : पक्षनिष्ठा गुंडाळून कोलांटउड्या, पक्षांतरांचा सपाटा

Akola Municipal Corporation Election : पक्षनिष्ठा गुंडाळून कोलांटउड्या, पक्षांतरांचा सपाटा

Many Switch Parties for Election Candidature : निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही माफ?, काहींनी मिळवले तिकीट, अनेकांचा भ्रमनिरास

Akola अकोल्यातील राजकारणाला सध्या वेगळेच वळण लागले आहे. तत्त्व, स्वाभिमान आणि पक्षनिष्ठा अक्षरशः बाजूला ठेवत अनेक राजकीय नेत्यांनी ऐनवेळी कोलांटउड्या घेत पक्षप्रवेश केल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. कालपर्यंत ज्या पक्षांवर सडकून टीका केली जात होती, त्याच पक्षांच्या झेंड्याखाली आज हेच नेते उभे राहत असल्याने राजकीय नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशोक कोलंबून मारणाऱ्या काही जणांना महापालिका निवडणुकीसाठी तिकीट मिळाली, तर काहींचा मात्र भ्रमनिरास झाल्याचे बघावयास मिळाले.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी न मिळाल्याची खदखद, अंतर्गत गटबाजी तसेच सत्तेच्या बदलत्या समीकरणांची भीती यामुळे अनेकांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र आहे. ‘विचारधारेपेक्षा विजय महत्त्वाचा’ हा नवा राजकीय मंत्र काही नेत्यांनी अंगीकारल्याचे दिसत असून, स्वार्थासाठी पक्ष बदलण्याची परंपरा अधिकच बळावत चालली आहे. याचा थेट परिणाम तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होत आहे.

Amravati Municipal Corporation election : महायुती दुभंगली; नाराजीचा सूर, राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार

विशेष म्हणजे, काही नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदांमधून आपल्या जुन्या पक्षावर भ्रष्टाचार, अपयश आणि जनतेची फसवणूक केल्याचे गंभीर आरोप केले होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्याच आरोपांचा विसर पाडत त्यांनी त्या पक्षात प्रवेश केल्याने राजकीय सोयीस्करपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, या कोलांटउड्या अल्पकालीन फायद्याच्या वाटत असल्या तरी दीर्घकालीन राजकारणासाठी घातक ठरणार आहेत. तत्त्वहीन राजकारणामुळे मतदारांचा विश्वास संपादन करणे अवघड होत असून, निवडणुकीनंतरही अस्थिरतेचे वातावरण कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘आज इकडे, उद्या तिकडे’ अशी भूमिका घेणाऱ्या नेत्यांवर जनता किती विश्वास ठेवणार, हा खरा प्रश्न आहे.

अकोल्यातील प्रमुख पक्षांनीही या घडामोडींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. पक्षश्रेष्ठींकडून ‘निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही माफ’ अशी भूमिका घेतली जात असल्याचे चित्र असून, तत्त्वनिष्ठ व निष्ठावान कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्यास असंतोष उफाळून येण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.

Bacchu Kadu : प्रहार-शिवसेना युती सरसकट नाहीच, फक्त एका प्रभागात एकत्र

दरम्यान, या पक्षप्रवेशांवरून सोशल मीडियावरही टीकेची झोड उठली आहे. नागरिक खुलेआम प्रश्न विचारत आहेत की, कालपर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले नेते आज जर सत्तेसाठी एकत्र येत असतील, तर जनतेसाठी लढण्याची भाषा किती प्रामाणिक आहे? अकोल्यातील या राजकीय उलथापालथीचे आगामी निवडणुकीवर काय परिणाम होतील, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्यातरी तत्त्व, स्वाभिमान आणि निष्ठा यांना तिलांजली देत सत्तेच्या भोवती फिरणारे राजकारण अधिकच उघडे पडले आहे.

error: Content is protected !!