Rift in Mahayuti; NCP Decides to Go Solo : अंतिम दिवशी २२ प्रभागांतून तब्बल ७१५ नामांकन अर्ज
Amravati अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिवशी २२ प्रभागांतून तब्बल ७१५ नामांकन अर्ज दाखल झाले. उमेदवारांच्या या प्रचंड गर्दीमुळे आणि ऐनवेळी महायुती फिसकल्याने दिवसभर आयाराम-गयारामची चांगलीच चांदी झाली. परिणामी अनेक उमेदवार शेवटच्या क्षणी इधर-उधर झाल्याचे चित्र दिसून आले.
भाजपाच्या नेतृत्वात महायुती निश्चित होईल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत केला होता. मात्र, हा दावा स्थानिक पातळीवर प्रत्यक्षात साकार होऊ शकला नाही. सोमवारी रात्री उशिरापर्यंत महायुतीच्या नेत्यांच्या बैठका सुरू असतानाही नामांकनाच्या अंतिम क्षणापर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने महायुतीवर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकले नाही.
Akola Municipal Corporation Election : वंचित आघाडीचे अकोल्यात ‘एकला चलो रे’
मंगळवारी अमरावती शहरातील विविध ठिकाणी नामांकन दाखल करण्यासाठी सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. भाजप, काँग्रेस, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी तसेच युवा स्वाभिमानने ऐनवेळी उमेदवारांना ए-बी फॉर्म दिले. त्यामुळे दिवसभर अफवांचा बाजार तापला होता. कोण कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहे, हे स्पष्ट होणे कठीण झाले होते. नामांकन अर्जांच्या छाननीनंतरच अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत.
महायुतीत फूट; नेत्यांचे मार्ग वेगळे
महायुतीतील तणावाची चाहूल शिवसेनेचे नेते जगदीश गुप्ता यांना सोमवारीच लागली होती. त्यामुळे त्यांनी तातडीने बैठक सोडली. मंगळवारी त्यांनी शिवसेनेलाही रामराम ठोकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. महायुतीतील मोठा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे स्थानिक नेते आ. संजय खोडके यांनी महिनाभरापूर्वीच स्वतंत्र लढण्याची भूमिका जाहीर केली होती. ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले असून राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी दमदार उमेदवार दिले आहेत.
जगदीश गुप्तांचा शिवसेनेलाही ‘जय श्रीराम’
भाजपाचे शहरातील मुरब्बी नेते म्हणून ओळख असलेले जगदीश गुप्ता यांनी ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेलाही अखेरचा ‘जय श्रीराम’ केला. विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजप सोडली होती. सोमवारी रात्री बैठकीतून बाहेर पडताच मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले होते. मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका स्पष्ट करत भाजपाचे स्थानिक नेतृत्व कुणालाही जुमानत नसल्याचा आरोप केला. शिवसेनेतही आपल्या मताला किंमत दिली जात नसल्याचे सांगत स्वतंत्र भूमिका घेणेच योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
PMC election : भाजपचा धाडसी प्रयोग; तरुण आणि महिलांना प्राधान्य
युवा स्वाभिमानची भाजपाला साथ; काँग्रेस सावध
दुसरीकडे आ. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेने भाजपाला साथ दिली आहे. राणा यांचे काही समर्थक व पदाधिकारी थेट कमळ चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसने मात्र सावध भूमिका घेतली आहे. माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विश्वासातील कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली असून काही ठिकाणी मित्रपक्ष *शिवसेना (उबाठा)साठी जागा सोडल्या आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या स्थानिक नेतृत्वाने काँग्रेससोबत न जाता स्वतंत्र लढण्याची भूमिका घेत इतर मित्रपक्षांना एकत्र करून तिसरी आघाडी उभारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.








