Akola Municipal Corporation : अकोल्यात भाजप-शिंदेसेना युती का फिसकटली?

Questions raised within the party over shinde sena’s go-it-alone decision : शिंदेसेनेच्या स्वबळाच्या निर्णयावर पक्षातच प्रश्नचिन्ह

Akola राज्यातील चार महापालिकांमध्ये भाजप–शिंदेसेना युती झाली असताना, अकोल्यात मात्र युती होण्याची संधी असूनही ती का साधली गेली नाही, यावर शिंदेसेनेच्या गोटातच जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपसोबतची नैसर्गिक युती बाजूला ठेवून शिंदेसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, स्वबळावर लढण्याच्या स्थानिक नेत्यांच्या अट्टहासामुळेच युतीचा प्रस्ताव अखेर फिसकटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. युती झाली असती, तर शिंदेसेनेला महापालिकेत सन्मानजनक यश मिळण्याची संधी होती; मात्र स्वबळाचा निर्णय पक्षाला राजकीयदृष्ट्या महागात पडू शकतो, असा सूर राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.

स्वबळाच्या भूमिकेमुळे शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपसोबत युती न करण्यामागचे नेमके कारण काय, याबाबत स्पष्टता नसल्याचे चित्र आहे. परिणामी, अकोला महापालिका निवडणुकीत स्वबळाच्या निर्णयाचा पक्षाला नेमका किती फटका बसेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Akola Municipal Corporation : अकोल्यात ४६९ उमेदवार आजमावणार नशीब, अंतिम यादी जाहीर

युती न झाल्याने शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संभाव्य उमेदवारांना घरी बोलावून थेट एबी फॉर्म दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे. मात्र या घाईघाईच्या आणि गोंधळलेल्या तयारीमुळे संभ्रम अधिकच वाढला असून, शिंदेसेनेचा अधिकृत उमेदवार नेमका कोण, असा प्रश्न खुलेआम उपस्थित होत आहे.

पदाधिकाऱ्यांचा हट्ट ठरला अडसर
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपसोबत युतीबाबत चर्चा सुरू होती. यासाठी शिंदेसेनेचे नेते व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी स्वतः अकोल्यात येऊन रात्री उशिरापर्यंत बैठका घेतल्या; मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या स्वबळावर लढण्याच्या हट्टापुढे अखेर राज्य नेतृत्वालाही माघार घ्यावी लागल्याचे बोलले जात आहे.

Amravati Municipal Corporation : सर्वच पक्षांच्या जाहीरनाम्यांची तयारी अंतिम टप्प्यात

मागील महापालिका निवडणुकीत एकत्रित शिवसेनेचे आठ नगरसेवक निवडून आले होते. बदललेल्या राजकीय समीकरणात भाजपसोबत युती झाली असती, तर ही संख्या वाढवण्याची संधी शिंदेसेनेला मिळू शकली असती, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीत १४ जागा मिळवत असताना, भाजपचा नैसर्गिक मित्र असलेल्या शिंदेसेनेलाही सन्मानजनक वाटा मिळू शकला असता, अशीही चर्चा आहे.

स्थानिक नेत्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे ही संधी गमावल्याची टीका आता पक्षातच दबक्या आवाजात सुरू झाली आहे. पक्षाची ताकद वाढवायची की केवळ स्वतःचे वर्चस्व टिकवायचे, असा थेट सवाल उपस्थित केला जात असून, मनापासून युतीची इच्छा नसेल तर चर्चा कितीही झाली तरी निर्णय कसा होणार, असा प्रश्नही विचारला जात आहे.

एकूणच, अकोला महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती न करण्यामागील खरे ‘गणित’ काय आणि स्थानिक नेतृत्वाने नेमका कोणता डाव खेळला, हे कदाचित निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.