Role of Muslim candidates likely to be decisive : गेल्यावेळी विविध पक्षांमधून १४ मुस्लीम नगरसेवक झाले होते विजयी
Akola महानगरपालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत मुस्लिम समाजातील उमेदवारांनी लक्षणीय यश मिळवत शहराच्या राजकारणात आपली निर्णायक भूमिका अधोरेखित केली होती. त्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांतून एकूण १४ मुस्लिम नगरसेवक निवडून आले होते. २०१२ च्या तुलनेत ही संख्या काहीशी कमी असली, तरी मुस्लिम समाजाचे प्रभावी प्रतिनिधित्व स्पष्टपणे दिसून आले होते.
सुमारे नऊ वर्षांनंतर १५ जानेवारी २०२६ रोजी अकोला महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर यंदा मुस्लिम नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. मात्र, प्रत्यक्ष चित्र १६ जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
Akola Municipal Corporation Election : यंदा प्रथमच सहा ठिकाणी मनपा निवडणुकीची मतमोजणी
२०१७ च्या निकालांकडे पाहता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून सर्वाधिक १० मुस्लिम नगरसेवक निवडून आले होते. यावरून शहरी मुस्लिम मतदारांमध्ये काँग्रेसची पकड मजबूत असल्याचे दिसून आले. तसेच, २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांच्या विजयामुळे मुस्लिम मतदारांचा सक्रिय सहभाग आणि वाढलेले मतदान प्रमाण अधोरेखित झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन मुस्लिम नगरसेवक विजयी झाले होते, तर ‘एआयएमआयएम’कडून एक आणि एक उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आला होता. या आकडेवारीवरून स्थानिक प्रश्न आणि उमेदवाराची वैयक्तिक प्रतिमा अनेकदा पक्षीय ओळखीपेक्षा अधिक महत्त्वाची ठरत असल्याचे स्पष्ट होते.
निवडून आलेल्या मुस्लिम नगरसेवकांनी सभागृहात केवळ उपस्थिती नोंदवली नाही, तर रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी, शिक्षण व आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले. २०२६ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी सर्वच राजकीय पक्षांसाठी दिशादर्शक ठरत आहे.
मुस्लिम मतदार एक संघटित व प्रभावी मतपेढी म्हणून पुढे येत असल्याने काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी गट, ‘एआयएमआयएम’ आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यासह सर्व प्रमुख पक्षांनी मुस्लिमबहुल प्रभागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून सक्षम उमेदवार दिल्यास अकोला महानगरपालिकेत मुस्लिम प्रतिनिधित्व वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
Municipal elections : ‘माझ्या पतीविरोधात…’ नवनीत राणांच्या भूमिकेचं बच्चू कडूंकडून कौतुक
२०१७ मनपा निवडणूक : पक्षनिहाय मुस्लिम नगरसेवक
काँग्रेस – १०
राष्ट्रवादी काँग्रेस – २
एआयएमआयएम – १
अन्य (अपक्ष) – १








