Municipal elections : प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र?

Thackeray group attack on Amit Satman : ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल

Mumbai : राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. कुठे डिजिटल प्रचार, कुठे सेलिब्रिटी, तर कुठे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, मुंबईतील एका प्रचार कार्यक्रमामुळे आता वाद निर्माण झाला असून भाजपवर जोरदार टीका होत आहे.

मुंबईतील वार्ड क्रमांक 157 मध्ये भाजप उमेदवार आशाताई तायडे यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमादरम्यान चक्क महिलांचा डान्स कार्यक्रम ठेवण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, काळ्या साडीत नाचणाऱ्या महिला थेट महापुरुषांच्या पुतळ्यांसमोर नाचताना दिसत असल्याने विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 

Raj Thackeray : राज ठाकरेंनी आपला पक्ष उद्धव ठाकरेंना सरेंडर केला

निवडणूक प्रचारासाठी वार्ड 157 मध्ये चक्का महिलांच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. “हा व्हिडीओ पहा, तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. भाजपा मुंबईत प्रचारसभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवत आहे. आणि हे करताना भाजपाच्या महाभागांना याचंही भान नाही की मागे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि देशाला संविधान देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आहेत. आमच्या महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र?” असा संतप्त सवाल अखिल चित्रे यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणात त्यांनी आपल्या पोस्टमध्ये भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि मंत्री आशिष शेलार यांनाही थेट टॅग करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. तसेच, या कार्यक्रमाचे आयोजक भाजपचे स्थानिक उमेदवार असल्याचा दावा करत संयोजक म्हणून सिद्धिविनायक ट्रस्टवर भाजपाने कोषाध्यक्ष म्हणून नेमलेल्या पवन त्रिपाठी यांचं नाव पुढे आणण्यात आलं आहे.

Santosh Dhuri : “आता इकडे राहण्यात काय अर्थ…”,

“हीच ती माणसं आहेत का जी आमच्या पवित्र मंदिराच्या विश्वस्त मंडळावर नेमताना भाजपाला लाज वाटली नाही?” असा सवाल करत अखिल चित्रे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. “मुंबईकरांनो, आपल्या महापुरुषांचा असा अपमान सहन करायचा नाही. सत्तेच्या मस्तीत वावरणाऱ्यांना धडा शिकवण्याची संधी वारंवार मिळत नाही. एकदाचा यांना शिवटोला देऊया,” असे आवाहनही त्यांनी केलं आहे.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले असून त्यांच्या समोर भाजप-शिवसेना युतीचे मोठे आव्हान आहे. मात्र, दोन भाऊ एकत्र आल्याने ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढलेला दिसत असून यंदाची मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे.

__