Thackeray group leader Chandrakant Khaire warns, criticizes Bawankule too : ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Beed : मराठवाड्यातील सर्वात मोठी महापालिका आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष प्रेम असलेलं शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरकडे पाहिलं जातं. सध्याच्या महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण, यंदा प्रथमच येथील निवडणुकी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होत आहे. त्यामुळे, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला संघर्ष करावा लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. तर, भाजप आणि शिंदे गट पैसा आणि सत्तेच्या जोरावर ही निवडणूक लढवत असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते करत आहेत.
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बीड दौऱ्यावर असतानाही मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. छत्रपती संभाजी नगर महापालिकेत सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारांना मॅनेज करून पैसे वाटप केले जात आहेत. पैसे वाटताना मला कोणी भेटले तर तिथेच त्याला बदडून काढणार असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे
चंद्रकांत खैरे यांनी दिला. आत्तापासूनच पैसे घेऊन मत विकत घेतली जात आहेत, असा गंभीर आरोपही चंद्रकात खैरे यांनी केला आहे. त्यामुळे, महापालिका निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन होणाऱ्या टीकेलालाही खैरेंनी प्रत्युत्तर देत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही कडक शब्दात टीका केलीय.
Municipal elections : प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र?
आम्ही हिंदुत्वविरोधी असतो तर रुद्राक्षाच्या माळा, गंध लावले नसते. हिंदुत्व तुम्ही संपवले असं म्हणत खैरे यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांना प्रतिउत्तर दिले. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करत बावनकुळे इलेक्ट्रिक कंत्राटदार होते. गडकरींनी त्यांना आणले आणि आता ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत. बावनकुळे नेते बदलू माणूस, त्याला काहीही माहित नाही असा एकेरी उल्लेख करत खैरेंनी बावनकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. .“खोटं बोल पण रेटून बोल, हेच सध्या त्यांचं सुरू आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आपला पक्ष उद्धव ठाकरेंना सरेंडर केला
छत्रपती संभाजीनगर हे शहर बाळासाहेब ठाकरे यांना विशेष प्रिय होतं, हे अधोरेखित करत खैरेंनी या निवडणुकीत जिंकून महापालिकेत आपलं अस्तित्व टिकवणारच, असा निर्धार व्यक्त केला. एकूणच, छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होत असून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे.
___








