Municipal elections : काँग्रेस आणि एमआयएमसोबतची युती खपवून घेतली जाणार नाही !

Action will be taken against guilty leaders – Devendra Fadnavis clear warning : दोषी नेत्यांवर कारवाई होणार – देवेंद्र फडणवीसांचा स्पष्ट इशारा

Mumbai : अकोट नगरपरिषदेत भाजपने एमआयएम सोबत तर अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेससोबत सत्तेसाठी युती केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणारा भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेसाठी वैचारिक विरोधकांसोबत हातमिळवणी करत असल्याचा आरोप होत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणत्याही परिस्थितीत युती खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी संबंधित नेत्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी अकोट आणि अंबरनाथमधील युतींचा स्पष्ट शब्दांत निषेध केला. भाजपची काँग्रेस किंवा एमआयएमसोबत युती होऊच शकत नाही. स्थानिक पातळीवर असे प्रकार घडले असतील तर ते पूर्णपणे चुकीचे आहेत. ज्यांनी कोणी अशी युती केली असेल, त्यांच्यावर पक्षाकडून निश्चितच कारवाई करण्यात येईल, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. या वक्तव्यामुळे भाजपमधील स्थानिक नेत्यांची धावपळ वाढली असून, पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.

Mumbai politics : हेच बघायचे राहिले होते! चक्क काँग्रेसचा भाजपमध्ये प्रवेश

अकोट नगरपरिषदेत भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नव्हते. 35 सदस्यांच्या नगरपरिषदेत भाजपला सर्वाधिक 11 जागा मिळाल्या, तर एमआयएमला 5 जागा मिळाल्या. बहुमताच्या आकड्यासाठी भाजपने ‘अकोट विकास मंच’ नावाची आघाडी स्थापन करत एमआयएमसह शिंदे गटाची शिवसेना, ठाकरे गटाची शिवसेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी, शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि प्रहार जनशक्ती पक्षाला सोबत घेतले. या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून भाजपचे नगरसेवक रवी ठाकूर गटनेते असणार आहेत. येत्या 13 जानेवारीला होणाऱ्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीत ही आघाडी एकत्रित मतदान करणार आहे.

Municipal elections : भाजपच्या चुकीमुळे नाहक त्रास नको, लोकशाही मार्गानेच उत्तर देऊ !

दुसरीकडे अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपने थेट काँग्रेससोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. येथे भाजपकडे बहुमत नसल्याने भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक एकत्र येत 32 जणांची मोट बांधण्यात आली. या युतीमुळे भाजपची नगराध्यक्षा तेजश्री करंजुळे विजयी झाल्या. विशेष म्हणजे या सत्तास्थापनेत भाजपने आपला मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेला दूर ठेवले, त्यामुळे शिंदे गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ही युती अभद्र असून भाजपने काँग्रेसशी हातमिळवणी करून शिवसेनेचा घात केला, अशी टीका शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी केली आहे.

अकोटमधील भाजप–एमआयएम युती आणि अंबरनाथमधील भाजप–काँग्रेस युतीमुळे विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका सुरू केली आहे. सत्तेसाठी भाजप वैचारिक तत्वांना तिलांजली देत असल्याचा आरोप होत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे आता पक्ष पातळीवर कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

___