व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Municipal elections: राजकारण तापले, इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला!

Municipal elections: राजकारण तापले, इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला!

Tension in Chhatrapati Sambhajinagar, mild lathi charge by police : छत्रपती संभाजीनगरात तणाव, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

Chhatrapati Sambhajinagar : महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एमआयएमचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. बायजीपुरा परिसरात प्रचार सुरू असताना नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून पक्षातील काही जुने कार्यकर्ते नाराज होते. जुन्या व स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून नव्या लोकांना संधी देण्यात आल्याचा आरोप करत या कार्यकर्त्यांनी आधी जलील यांना काळे झेंडे दाखवले. त्यानंतर त्यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. काही जणांनी धारदार शस्त्राचा वापर केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Municipal elections : मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव

हल्ल्यानंतर इम्तियाज जलील यांनी थेट जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. घोषणाबाजी आणि हाणामारी सुरू झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. काही काळ या भागात तणावपूर्ण शांतता होती.

या घटनेनंतर इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, राजकारणात असे प्रकार होत असतात. मला त्यांच्या बाबतीत काही बोलायचे नाही. लोकशाहीने मला कुठेही जाण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार दिला आहे आणि मी तो करत आहे. आमचा उमेदवार असल्याने आम्ही प्रचार करणारच आहोत. १६ तारखेला निकाल लागल्यानंतर काळ्या झेंड्यांचा आणि हिरव्या झेंड्यांचा अर्थ काय आहे, ते स्पष्ट होईल, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

Ajit Pawar: भाजपशी जमेना, भाजपवाचून करमेना; अजित पवारांची राजकीय कोंडी

दरम्यान, एका नाराज कार्यकर्त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, वॉर्डमधील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक नगरसेवक हवा असतो. मात्र या वॉर्डसाठी १० किलोमीटर दूर राहणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच कारणामुळे मोठ्या संख्येने तरुणांनी जलील यांना काळे झेंडे दाखवून विरोध केला, असा दावा करण्यात आला आहे.

या घटनेमुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएममधील अंतर्गत गटबाजी उघडकीस आली असून, पुढील काळात राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

___

error: Content is protected !!