BJP instructs workers to trace relatives and motivate them to vote : अमरावती महापालिका निवडणुकीसाठी भाजपची आक्रमक रणनीती; ग्रामीण भागातील आमदारांवर प्रभागनिहाय जबाबदारी
Amravati अमरावती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजप आमदारांना पक्षाच्या वरिष्ठांकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. अमरावती शहरात आपली नातीगोती शोधा, आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी घ्या आणि भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी थेट आवाहन करा, अशा सूचना आमदारांना देण्यात आल्याची माहिती आहे. तसेच काही प्रभाग दत्तक घेऊन उमेदवारांच्या प्रचारात स्वतःला झोकून देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शहरात सभा, रॅली, प्रचार कार्यालयांची उद्घाटने यासाठी मंत्री, आमदार आणि भाजप नेत्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अमरावती महापालिकेची निवडणूक २२ प्रभागांतून ८७ नगरसेवकांच्या निवडीसाठी होत आहे. या निवडणुकीत एकूण ६६१ उमेदवार रिंगणात असून भाजपचे ६८ उमेदवार ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. मागील निवडणुकीत महापालिकेत भाजपची सत्ता होती. यावेळी ‘५५ प्लस’चे उद्दिष्ट ठेवून अत्यंत सूक्ष्म आणि काटेकोर नियोजन करण्यात येत आहे.
Akola Municipal Corporation Election : “आमचं मत वाईन शॉप हटवणाऱ्याला”!
ग्रामीण भागातील भाजप आमदार आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांकडे प्रभागनिहाय जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. त्यासाठी भाजपने अमरावतीतील एका अलिशान हॉटेलमध्ये स्वतंत्र ‘वॉर रूम’ स्थापन केली आहे. याच वॉर रूममधून अमरावती महापालिका निवडणुकीसाठी मायक्रो प्लॅनिंग सुरू असल्याची माहिती आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापालिका निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील, निरीक्षक जयंत देहनकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, भाजप शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे आदी नेते हे मिशन यशस्वी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.
धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड, तिवसा येथील आमदार राजेश वानखडे, मोर्शीचे आमदार उमेश यावलकर, अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे, मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकारी आणि माजी आमदारांवरही प्रभागनिहाय उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एका आमदाराकडे पाच ते सात प्रभाग देण्यात आल्याची माहिती आहे.
NCP PMC Election 2026 : ‘एकच वादा, अजित दादा’; पुणेकरांना मेट्रो आणि बस प्रवास मिळणार मोफत!
महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे अधिकाधिक नगरसेवक निवडून यावेत, यासाठी भाजपने आमदारांना बंदद्वार बैठका, कार्नर मिटिंग आणि मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या पाच दिवसांत ‘मिशन मोड’वर मतदारांच्या भेटीगाठी घेऊन भाजपच्या विकासाचे व्हिजन जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आमदारांना करावे लागणार आहे. भाजपचा महापौर विराजमान करण्यासाठी ही रणनीती आखण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.
अमरावती महापालिका निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली असून ग्रामीण भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते सध्या अमरावती शहरात ठाण मांडून बसले आहेत. या निवडणुकीत नातीगोत्यांना विशेष महत्त्व देण्यात आले असून, एका-एका मताला महत्त्व असल्याने भाजपचे कार्यकर्ते आपल्या नातेवाईकांपर्यंत थेट पोहोचत आहेत. मतदार यादीवर काम सुरू असून, शहराबाहेर असलेल्या नातलगांना मोबाईलद्वारे मतदानासाठी आवाहन केले जात असल्याचे चित्र आहे.








