पदवीधर निवडणुकीसाठी सुटीच्या दिवशीही बळजबरीने बैठका
Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वातावरण तापले असून, भाजपच्या कथित दबावतंत्रामुळे खाजगी शाळांचे संचालक आणि शिक्षण क्षेत्रात संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे. भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासाठी खाजगी व अनुदानित शिक्षण संस्थांच्या संचालकांवर थेट कारवाईचा धाक दाखवून बैठका बोलावल्या जात असल्याचे सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे, सार्वजनिक सुटीच्या दिवशी आणि शैक्षणिक कामकाज सोडून कर्मचाऱ्यांना बळजबरीने या बैठकांना उपस्थित राहावे लागत आहे.
निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपच्या एका बड्या नेत्यामार्फत शैक्षणिक संस्थांच्या संचालकांना थेट फोन करून दमदाटी केली जात असल्याचा आरोप होत आहे. सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बैठकीला आणा, अन्यथा गंभीर कारवाईला सामोरे जा, असा थेट इशारा दिला जात असल्याचे बोलले जात आहे.
‘महायुतीचे डोळे गोट्या खेळण्याइतके सोपे नाहीत’; एकनाथ शिंदेंचा वडेट्टीवारांना पलटवार
याच दबावापोटी रविवारी खामला परिसरातील अर्जना सभागृहात एका मोठ्या शैक्षणिक संस्थेची बैठक पार पडली, तर सोमवारी दुपारी वर्धा रोडवरील एका नामवंत सीबीएसई शाळेत अशीच एक बैठक बोलावण्यात आली आहे. सुटीच्या दिवशी बैठका लावण्यास किंवा नकार दिल्यास प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला जाईल, या भीतीने अनेक संस्थाचालक नाइलाजास्तव नेत्यांचे फर्मान पाळत आहेत.
भाजपने या निवडणुकीत सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली असून, राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या निवडणुकीचे प्रभारी आहेत.
‘एसआयटी लावूनच दाखवा, पळता भुई थोडी होईल’; बावनकुळेंना काँग्रेसचे आव्हान!
त्यांच्याच आग्रहामुळे कोहळे यांना तिकीट मिळाल्याने माजी आमदार अनिल सोले उघडपणे नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या निवासस्थानी भेट द्यावी लागली होती. नाराजी मिटली असले असे दावे केले जात असले, जरी पक्षाचे नेते आता मंचावर एकत्र दिसत असले, तरी पक्षात आतून मोठी धुसफूस आणि रोष कायम आहे.
हा अंतर्गत धोका ओळखूनच भाजपची यंत्रणा कामाला लागली असून, सत्तेच्या आणि सरकारच्या विशेषाधिकारांचा गैरवापर करून खाजगी शैक्षणिक संस्थांवर अप्रत्यक्ष दबाव टाकला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता या धाकदपटशाचा किती फायदा भाजपला होतो, हे निवडणुकीचे निकालच ठरवणार आहेत.
भाजपने गमावलेली ही प्रतिष्ठेची जागा कोणत्याही परिस्थितीत परत मिळवण्यासाठी कंबर कसली असून, यासाठी ‘साम, दाम, दंड, भेद’ या सर्वच उपायांचा वापर केला जात असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, काँग्रेसने मागील निवडणुकीत ऐतिहासिक विजय नोंदवणारे अभिजित वंजारी यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले असून, काँग्रेसनेही या निवडणुकीत आपली पूर्ण ताकद लावली आहे. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक अतिशय चुरशीची आणि अटीतटीची होणार यात शंका नाही.








