Akola Municipal Corporation Election : अकोल्यात महिलांनी साड्या फाडून केली होळी

Akola witnesses saree-burning protest by women : साड्या नव्हे, विकासासाठी मतदान, प्रलोभनांना ठाम नकार

Akola महापालिका निवडणूक अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली असताना अकोल्यातील ताथोड नगर परिसरातील काही महिलांनी मतदानाबाबत ठाम आणि स्पष्ट संदेश दिला आहे. सोमवारी रात्री घरांच्या दरवाज्यांवर ठेवलेल्या साड्या फाडून त्यांची होळी करत महिलांनी नकारात्मक राजकीय प्रथा आणि मतदारांना दिल्या जाणाऱ्या प्रलोभनांविरोधात आपला निषेध व्यक्त केला.

सोमवारी रात्री काही पक्षीय कार्यकर्त्यांनी ताथोड नगरातील घरांच्या दारांवर साड्या ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. मात्र या साड्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असून, प्रत्येकी सुमारे १०० रुपयांच्या असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. साड्या हातात घेताच महिलांनी त्या फाडून टाकत त्याच ठिकाणी होळी केली. “आम्ही साड्या देणाऱ्यांना नव्हे, तर विकास करणाऱ्यांना मतदान करू,” अशी ठाम प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली.

Nashik Municipal Corporation Election : नाशिकमध्ये भाजपचं मोठं ‘ऑपरेशन’; माजी महापौरांसह ५४ बंडाखोर नेत्यांची हकालपट्टी

महिलांच्या या भूमिकेचे समाजातील विविध स्तरांतून स्वागत होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. लहानसहान प्रलोभने देऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या प्रथा निषेधार्ह असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. हा प्रकार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास, पारदर्शकता आणि जबाबदार राजकारणावर भर देण्याची गरज अधोरेखित करणारा ठरला आहे.

महापालिका निवडणुकीत २० प्रभागांतील ८० जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, यंदा मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ताथोड नगरातील महिलांनी दिलेला संदेश स्पष्ट असून, विकासाच्या मुद्द्यांवर आधारित मतदान करण्याची भावना नागरिकांमध्ये अधिक दृढ होत असल्याचे या घटनेतून दिसून येते.