Raj Thackeray’s strong attack on the Election Commission : oराज ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल
Mumbai: मुंबई महापालिका निवडणूक 2026 च्या मतदानादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदान केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. मतदारांच्या बोटावर शाईऐवजी मार्कर पेनचा वापर केल्यामुळे खूण पुसली जात असल्याचे प्रकार समोर येत असून दुबार मतदानाचा धोका निर्माण झाला असल्याचा आरोप त्यांनी केला. यावरून राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ऐनकेनप्रकारे निवडणुका जिंकण्यासाठी सरकार आणि संपूर्ण प्रशासन काम करत आहे.
दुबार मतदारांचा विषय गंभीर असून VVPAT चा वापरच केला जात नाही आणि आता नव्याने PADU नावाचे यंत्र आणण्यात आले आहे. हे यंत्र मतमोजणीच्या वेळी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले जात असले तरी त्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. विरोधी पक्ष नावाची गोष्टच ठेवायची नाही, सरकारनेच ठरवायचे की निवडणुका कशा जिंकायच्या, असा आरोप त्यांनी केला. विधानसभेला जे झाले तेच आता महापालिकेत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत आम्ही ते होऊ देणार नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.
BMC Election 2026 : मतदान करून परतलेल्या मतदारांच्या बोटावरील शाई पुसली गेली
PADU मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेले नाही, त्याबाबत निवडणूक आयोगाने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही, असा आरोप करत राज ठाकरे म्हणाले की, पत्र पाठवून माहिती मागितल्यानंतरही आयोग ती देत नाही. काल अचानक प्रचाराचा एक दिवस वाढवून देण्यात आला, यामागे कोणताही ठोस नियम नाही. हा नियम अचानक आणण्यात आला असून तो पैसे वाटण्यासाठीच असल्याचा आरोप त्यांनी केला. संपूर्ण प्रशासन सत्तेसाठी काम करत असून ही चांगल्या लोकशाहीची लक्षणे नाहीत, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, आज निवडणूक आयोगाने आणखी एक नवा प्रयोग केला आहे. याआधी मतदारांच्या बोटावर शाई लावली जायची, आता पेनचा वापर केला जात आहे. या पेनच्या शाईबाबत इतक्या तक्रारी येत आहेत की सॅनिटायझर लावल्यावर ती सहज पुसली जाते. महाराष्ट्र सैनिकांनी सर्व मतदान केंद्रांवर सतर्क राहावे, कोण शाई पुसून पुन्हा मतदानासाठी येत आहे का, यावर लक्ष ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
Municipal Election: महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू !
‘शाई पुसा आणि परत जा, पुन्हा मतदान करा हा त्यांचा विकास आहे का?’ असा खोचक सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी भाजपवर जहरी टीका केली. तसेच माध्यमांनीही अशा प्रकारांवर बारकाईने लक्ष ठेवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान समोर येत असलेल्या या घडामोडींमुळे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.








