Bajoria father-son duo alleges that the entire Amravati election has been managed : उच्च न्यायालयातील पुढील सुनावणीत पुरावे सादर करणार असल्याचा इशारा
Akola विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेबाबत बाजोरिया पिता-पुत्रांनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच ‘मॅनेज’ करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्या उमेदवारी अर्जाप्रमाणेच भरलेले १७ उमेदवारांचे अर्ज असल्याचे सांगत त्यासंदर्भातील कागदपत्रे त्यांनी सादर केली आहेत. हे पुरावे ते उच्च न्यायालयात होणाऱ्या पुढील सुनावणीत सादर करणार आहेत.
माजी आमदार विप्लव
बाजोरिया यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी हायकोर्ट व त्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही. त्यानंतर आता माध्यमांशी बोलताना बाजोरिया पिता-पुत्रांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक उमेदवारांच्या अर्जांमध्ये समान प्रकारची माहिती आणि स्वरूप आढळत असल्याचा दावा विप्लव आणि गोपीकिशन बाजोरिया या दोन्ही माजी आमदारांनी केला आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी त्यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांच्या भूमिकेबाबतही शंका व्यक्त केली. निवडणूक प्रक्रियेत काही अनियमितता झाल्या असाव्यात, असा संशय व्यक्त करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, बाजोरिया पिता-पुत्रांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, संबंधित आरोपांवर निवडणूक प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आरोपांची सत्यता आणि सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.








