The installment of the Ladki Bhaini Yojana has been delayed for two months : दोन महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडला
Nagpur : राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सध्या अडचणीत सापडल्याचं चित्र असून गेल्या दोन महिन्यांपासून हप्ता न मिळाल्याने महिलांचा संताप उफाळून आला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता आणि या योजनेचा थेट राजकीय फायदा महायुतीला झाल्याचं मानलं जातं. मात्र, निवडणुका संपल्यानंतर आता हप्तेच मिळत नसल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. या योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळाला असून विधानसभा निवडणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या बाजूने मतदान केल्याचं बोललं जातं. त्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मात्र, सत्तास्थापनेनंतरच लाडकी बहीण योजनेचा हप्ता वेळेवर न मिळाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Thane politics : निकाल लागताच भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, ठाण्यात राजकीय भूकंप
गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना बंद होणार, अशा चर्चा रंगत होत्या. त्यावर सरकारकडून वारंवार ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं. मात्र, अर्थमंत्री अजित पवार यांनी योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचं मान्य केलं असून इतर विभागांचा निधी या योजनेसाठी वळवला जात असल्याचंही सांगितलं जात आहे.
दरम्यान, कालच राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकांदरम्यानही अनेक पक्षांनी लाडकी बहीण योजनेचा मुद्दा प्रचारात वापरला. मात्र, प्रत्यक्षात दोन महिन्यांपासून हप्ता न मिळाल्याने भंडारा जिल्ह्यात महिलांचा संताप रस्त्यावर उतरला. लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नसल्याने महिलांनी थेट मुंबई – कोलकाता महामार्ग रोखून आंदोलन केलं.
Malkapur Municipal Council : स्वीकृत सदस्य निवडीवर काँग्रेसमध्ये खळबळ
भंडारा जिल्ह्यातील महिला मोठ्या संख्येने एकत्र येत रस्त्यावर उतरल्या आणि काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प केली. यावेळी महिलांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा देत हप्ता तात्काळ जमा करण्याची मागणी केली. राज्यात महापालिकांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू होती. त्याचबरोबर काँग्रेसने निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजनेचा हप्ता देऊ नये यासाठी याचिका दाखल केल्याचा मुद्दाही या विलंबामागे असल्याचं बोललं जात आहे.
Malkapur Municipal Council : सत्तासंघर्षात अॅड. हरीश रावळ ठरले ‘किंगमेकर’!
दोन महिन्यांपासून महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. अखेर संतप्त महिलांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. महामार्ग रोखणाऱ्या महिलांना पोलिसांनी काही वेळात तिथून हटवलं, मात्र महिलांचा रोष कायम असल्याचं पाहायला मिळालं.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेमका कधी मिळणार, हा प्रश्न आता राज्यभरातील महिलांकडून सातत्याने विचारला जात आहे. मात्र, सरकारकडून याबाबत अद्याप ठोस आणि स्पष्ट उत्तर देण्यात आलेले नसल्याने महिलांमधील अस्वस्थता वाढत चालली आहे.
___








