Pressure politics mounts on the BJP for power in Mumbai : मुंबईच्या सत्तेसाठी भाजपवर दबावाचे राजकारण?
Mumbai मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तेच्या चाव्या फिरवण्यास सुरुवात झाली आहे. भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी २९ जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आता ‘महापौरपदा’वर आपला दावा ठोकला आहे. विशेष म्हणजे, २३ जानेवारी २०२६ पासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असल्याने, या ऐतिहासिक वर्षात शिवसेनेचाच महापौर असावा, अशी भावनिक साद घालत शिंदेंनी भाजपवर मोठा राजकीय दबाव निर्माण केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी झाला होता. त्यानिमित्ताने २०२६ हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. “शिवसैनिकांच्या मनात बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर असावा अशी तीव्र भावना आहे,” असे विधान करून एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. भाजपला मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाच्या २९ नगरसेवकांची नितांत गरज आहे, त्यामुळे शिंदेंची ‘बार्गेनिंग पॉवर’ (Bargaining Power) कमालीची वाढली आहे.
महायुती: भाजप (८९) + शिवसेना शिंदे गट (२९) = ११८ (बहुमत ११४)
विरोधी पक्ष: शिवसेना उबाठा (६५) + काँग्रेस (२४) + एमआयएम (८) + मनसे (६) + सपा (२) + इतर = १०६
बहुमतासाठी अंतर: विरोधकांना सत्तेपासून रोखण्यासाठी महायुतीकडे केवळ ४ जागांचे अधिकचे संख्याबळ आहे.
जर ठाकरे गटाने काही अपक्ष किंवा इतर पक्षांच्या ८ नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले, तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवले जाऊ शकते. हीच भीती ओळखून एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना वांद्रे येथील आलिशान हॉटेलमध्ये ठेवले आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची फोडाफोडी होऊ नये.
मुंबईसह २९ महापालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण २२ जानेवारी रोजी मुंबईतील मंत्रालयात जाहीर होणार आहे. या आरक्षणावरच महापौराचा चेहरा निश्चित होईल. जर हे पद ‘खुल्या’ प्रवर्गासाठी किंवा ‘ओबीसी पुरुष’ प्रवर्गासाठी निघाले, तर भाजप आणि शिंदे गटात पदाच्या वाटपावरून मोठी ओढाताण होण्याची शक्यता आहे.
Pratibha Dhanorkar : ‘वडेट्टीवारांनी माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप करू नये’
सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वित्झर्लंड दौऱ्यावर असून ते २४ जानेवारीला मुंबईत परतणार आहेत. त्यांच्या आगमनानंतरच भाजप आणि शिंदे यांच्यात ‘अडीच-अडीच’ वर्षांचा फॉर्म्युला किंवा अन्य कोणत्याही सत्तेच्या वाटपावर शिक्कामोर्तब होईल. २३ जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंती दिनी शिवसेना मोठ्या शक्तीप्रदर्शनाची तयारी करत असून, त्याच दिवशी महापौरपदाबाबत काही मोठी घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.








