Akola Mayoral Election : महापौरपदासाठी ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा; भाजपकडून शारदा खेडकर तर ठाकरेंकडून सुरेखा काळेंचे आव्हान!

BJP fields Sharda Khedkar, while Thackeray camp counters with Surekha Kale : ३० जानेवारीला काँटे की टक्कर; भाजपच्या ‘पवित्रकार’ यांनीच फुंकले बंडाचे निशाण, ठाकरेंच्या मदतीने पुतण्याच मैदानात!

Akola अकोला महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक आता अत्यंत अटीतटीच्या वळणावर येऊन पोहोचली आहे. भाजपने निर्विवाद बहुमताचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात अर्ज भरण्याच्या दिवशी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. भाजपकडून शारदा खेडकर यांनी महापौरपदासाठी, तर अनिल गोगे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, भाजपचे माजी मंत्री रणजीत पाटील यांचे पुतणे आशिष पवित्रकार यांनी अपक्ष बंडखोरी केल्याने भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

या निवडणुकीतील सर्वात मोठा धक्का म्हणजे आशिष पवित्रकार यांची बंडखोरी होय. पवित्रकार यांनी उपमहापौर पदासाठी अपक्ष अर्ज भरला असून, त्यांच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेवकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. महाविकास आघाडीने भाजपला रोखण्यासाठी ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. महापौरपदासाठी ठाकरेंच्या सुरेखा मंगेश काळे रिंगणात असून, त्यांना काँग्रेस आणि इतर छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू आहेत.

Amravati Municipal Corporation : अमरावतीत महापौरपदासाठी रवी राणा-भाजप पुन्हा एकत्र?

८० सदस्यीय अकोला महापालिकेत सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी ४१ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे. भाजपने आधीच ४४ नगरसेवकांचा ‘शहर सुधार आघाडी’ नावाचा गट नोंदवला आहे. मात्र, पवित्रकार यांच्या बंडखोरीमुळे या गटातील काही नगरसेवक फुटणार का? अशी भीती भाजपला सतावत आहे. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने खबरदारी म्हणून शारदा खेडकर यांच्यासोबतच कल्पना गोटफोडे यांचा ‘डमी’ अर्जही भरून ठेवला आहे.

उपमहापौर पदासाठी सर्वाधिक चुरस पाहायला मिळत आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार अनिल गोगे यांच्यासमोर काँग्रेसचे आझाद खान, भाजपचेच दुसरे नगरसेवक अमोल मोहोकार आणि बंडखोर आशिष पवित्रकार यांचे आव्हान आहे. जर विरोधकांनी पवित्रकार यांना पाठिंबा जाहीर केला, तर भाजपला उपमहापौरपद टिकवणे कठीण जाऊ शकते.

Free Trade Agreement : भारत–युरोपियन महासंघात आज ऐतिहासिक मुक्त व्यापार करार !

३० जानेवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत मतदानाद्वारे सत्तेचा कौल स्पष्ट होईल. काँग्रेसचे आझाद खान आपला अर्ज मागे घेऊन अपक्ष पवित्रकार यांना पाठिंबा देतात की स्वतः मैदानात राहतात, यावर भाजपविरोधी आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे. अकोलेकर जनतेचे लक्ष आता याकडे लागले आहे की, भाजप आपली गळती रोखून शारदा खेडकर यांना विराजमान करते की महाविकास आघाडी ‘आशिष पवित्रकार’ यांच्या माध्यमातून भाजपच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावते.